INFINITY PEACE
Our Articles
वैज्ञानिकांच्या विश्वात
About Website
भारतीय स्वातंत्र्ययुद्ध
भारतीय स्वातंत्र्यसमराचा जाज्वल्य इतिहास असंख्य ज्ञात-अज्ञात नरवीरांच्या पावन रक्ताने लिहला गेला आहे. स्वातंत्र्यकाळात बलिदान देणारे असंख्य हुतात्मे आज काळाच्या ओघात विस्मृतीत गेले. निढळ आत्मविश्वास, निखळ देशभक्ती, निरपेक्ष त्याग आणि निष्काम कर्मयोग सर्वांनी युक्त, या क्रांतीवीरांचे जगणे सामान्य मानवाला जीवनशक्तीचा संजीवन मंत्र पुरवते.
भारतीय इतिहासाचा आणि विशेषतः स्वातंत्र्यसमराचा तर्कसंगत, विशुद्ध, सप्रमाण पुराव्यानिशी अभ्यास होणे, ही आजच्या काळाची गरज आहे. दुर्दैवाने सशस्त्र क्रांती संबंधी इतिहासाचं लिखाण स्वातंत्ऱ्यानंतर बऱ्याच कमी प्रमाणात झालं.
लहान भाऊ कुलतारसिंह याला शेवटच्या पत्रात भगतसिंग लिहतात__“हवा में रहेगी मेरे ख्याल की बिजली | ये मुश्ते-ख़ाक है फानी, रहे रहे न रहे ||”. क्रांतीवीरांच्या अमर गाथा, त्यांचे अनेक प्रेरणादायी प्रसंग आणि त्यांची मातृभूमीसाठी समर्पित असलेल्या जीवनाची कहाणी आम्ही तुम्हा सर्वांपर्यंत आमच्या लेखांद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या क्रांतीकारकांचे बलिदान अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या पिढीच्या स्मरणात रहावे, हा लेखनी हाती घेण्यासाठीचा एकमेव उद्देश आहे.
खगोलशास्त्र
गेल्या हजारो वर्षांपासून रात्रीच्या समयी अवकाशात टीम-टिमणाऱ्या सहस्रावधी ताऱ्यांचं मानव निरीक्षण करतं आलाय. अवकाशातील ग्रह-तारे-उल्का आणि इतर खगोलीय घटकांच्या उत्पत्ती, जीवनपद्धती, परिवलन आणि ऱ्हास या सर्वांचा अभ्यास म्हणजे “खगोलशास्त्र”. खरं सांगायचं झालं तर आपल्या DNA मध्ये असणारा नायट्रोजन, दातांमध्ये असणारं कॅल्शियम, रक्तामध्ये असणारा लोह तसेच इतर संयुगे आपण दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या सर्वच्या सर्व गोष्टीं ज्या अणूंपासून बनलेल्या आहेत ते अणू, आजपासून अब्जावधी वर्षांपूर्वी कुण्या ताऱ्याच्या केंद्रात तयार झाले आहेत.
“WE ARE NOT FIGURATIVELY, BUT LITRALLY STARDUST !”
हे रहस्यमयी ब्रम्हांड नक्की आहे तरी काय? त्याची कोडी सोडवणारे वैज्ञानिक नक्की कसा विचार करतात? या विश्वाचा पसारा सामावून घेणारे खगोलशास्त्र आणि या भूतलावर जन्माला आलेले महान वैज्ञानिक यांची महती आणि माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावी, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत.
OUR AUTHORS
संदेश पितांबरे
शिक्षण : – BE (Mechanical) & MBA (Marketing)
का कुणास ठाऊक पण या पोरकट मनाला जमीनीपेक्षा, अंतराळाचंच जास्त वेड लागलं…! सावरकर म्हणतात___“कोणत्या हेतूने वा हेतुवाचून हे जगड्व्याळ विश्व प्रेरित झाले ते मनुष्याला तर्किता देखील येणे शक्य नाही. जाणता येणे तेवढे शक्य आहे”. आज आपल्यातील कित्येकजण परीक्षांच्या, मार्कांच्या,नोकऱ्यांच्या व्यवहारी दुनियेत अक्षरशः गुंतून गेलेत. परिणामतः एकेकाळी आकाशातील लुकलूकणाऱ्या ताऱ्यांकडे, विश्वातील आनंतावधी सृष्टीचमत्कारांकडे, अगदी कुतूहुलाने पाहणारे डोळे मात्र काळानुरूप बोथट अन व्यवहारी झाले.
माऊली म्हणतात नं “शब्द मावळलिया निवांत निजे”. एकदा की आसपासच्या गोष्टींबद्दल मनाला पडणारे सहस्रावधी प्रश्न मावळले की मग, उरतो तो आसपासच्या जगात फक्त profit अन loss पाहणारा मेंदू. अब्जावधी वर्ष वयोमान असलेल्या विश्वातील अगणित ताऱ्यांपैकी, कुण्या एका ताऱ्याच्या छत्रछायेत वसणाऱ्या, एका लहान ग्रहावर ६०-८० वर्ष चाललेला, शून्यातून उदयास येऊन शून्यात विलीन होण्यापर्यंतचा संघर्ष म्हणजे माझा जीवनप्रवास.
आयुष्याच्या प्रवासाला पुस्तकरूपी मित्राची साथ लाभली. शिवाजी महाराज, भगतसिंग, सावरकर यांसारख्या विभूतींनी मनावर अधिराज्य गाजवलं. खगोलशास्त्र, क्वांटम फिजिक्स मधील प्रश्नांनी कित्येक रात्री झोपू दिलं नाही. रात्री बेरात्री 2-3 वाजेपर्यंत वाचन आता नेहमीचंच झालंय. शिवाजी महाराजांचा इतिहास नेमका जाणून घेण्यासाठी पावलं कधी डोंगर, दऱ्यांकडे वळली कळलं सुद्धा नाही. वेळ मिळाला की दोन – चार दिवस सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त हिंडायचं, कधी आठवणींच्या रूपाने तर कधी छायाचित्रात ते क्षण टिपून ठेवायचे हाही आवडतीचा छंद.
वाचायला आवडतं, म्हणून लेखणीची आवड लागली. खगोलशास्त्र, भारतीय स्वातंत्र्य समर, विज्ञान, क्रांतिकारक, शिवराय यांसारख्या विषयांची माहिती तोडक्या मोडक्या शब्दांत पोहचवण्यासाठी हा प्रपंच !
सागर जाधव
वाणिज्य शाखेत पदवीधर झाल्यानंतर सध्या लेखक म्हणून विविध क्षेत्रात काम करतोय. मुळात संरक्षण खात्यात आणि विशेषतः भारतीय सेनेत जाण्याची उत्कट इच्छा होती, मात्र काही कारणास्तव त्यात यशस्वी झालो नाही. खगोलशास्त्र, विज्ञान आणि क्रीडा या आवडत्या विषयांवर वाचन आणि लिखाण सुरूच असतं. कधीतरी एकांतात सुचलेली कवितादेखील कागदावर उतरवतो. नेहरू तारांगणसारखं खगोलविश्वाच्या प्रेमात पाडणारं ठिकाण अगदीच घराच्या बाजूला, त्यामुळे याच ठिकाणी ग्रह, तारे, नक्षत्र, आकाशगंगा आणि समस्त ब्रह्मांडाची सैर करण्याची संधी मिळाली. आकाशात डोकावून ताऱ्यांमध्ये आपलं भूतकाळ पाहून भविष्याच्या विचार करणारी लोकं फार कमी, त्यातलाच एक मी !
भगत सिंह हा फार जवळचा व्यक्ती, त्यामुळे त्याच्यासोबत असलेली नाळ आयुष्यभर तुटणार नाही. भगत सिंहसह इतर क्रांतिकारी किंवा स्वातंत्र्य लढ्यातील घटना यावर अनेकदा लिखाण केले आहे, पुढेही करत राहीन. प्राचीन नाणी गोळा करणे, हा नुकताच जडलेला छंद. अगदी २५०० वर्षांपूर्वीच्या मौर्य, मगध साम्राज्याच्या नाण्यांपासून ते शिवराईपर्यंत विविध साम्राज्यांची नाणी संग्रहात आहेत. बालपणापासून चित्रकलेचीसुद्धा आवड, त्यामुळे अनेकदा माझ्या लेखांना माझ्याच चित्रांची जोड मिळते. गिर्यारोहण आणि मराठा इतिहासाच्या वेडापायी आतापर्यंत ७६ किल्ल्यांची पायपीट केली आहे. भविष्यात महाराष्ट्र भूमीतले ३५० किल्ले नक्कीच पूर्ण करणार, असा अट्टहास मनी धरला आहे. जागतिक तापमानवाढ या विषयालाही माणसांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, यासाठी मी आपल्या लेखणीतून सदैव प्रयत्नशील आहे.