You are currently viewing क्रांतीपथावरील अग्निशलाका – बेगम हजरत महल

क्रांतीपथावरील अग्निशलाका – बेगम हजरत महल

भारतीय स्वातंत्र्य युद्धात आणि विशेषत: १८५७च्या स्वातंत्र्य समरात भारतीय हिंदू, मुस्लिम भेद विसरून एकोप्याने ब्रिटिशांविरुद्ध लढत होते. तत्कालीन काळात इस्लाम कर्मठ धार्मिक रुढींचा पगडा होता, स्त्रियांना समाजात मानाचे स्थान नव्हते. भारतात तसे बरेच मुस्लिम राजे होऊन गेले, पण पराक्रम गाजवणाऱ्या मुस्लिम स्त्री योद्धांबाबत अनेकदा मौन बाळगले गेले. धर्मावर पुरुषांचा आणि भारतावर ब्रिटिशांचा पगडा असताना स्वातंत्र्यासाठी अवधची राणी “बेगम हजरत महल” यांनी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात लखनौ मधून १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व केले होते. आज या अज्ञात वीरांगनेचा इतिहास आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

बेगम हजरत महल

बेगम हजरत महल यांचा जन्म १८२० साली फैजाबादच्या अवध संस्थानात झाला. बेगम हजरत महल यांचे मूळ नाव मुहम्मदी खानम होते. मुळात बेगम या गरीब कुटुंबात जन्माला आल्या होत्या, पण फार सुंदर होत्या. अवधचे नवाब वाजिद अली शाह यांनी त्यांच्या सौंदर्यावर मोहित होऊन त्यांच्याशी विवाह केला. बेगम या नवाबच्या दुसऱ्या पत्नी होत्या. राजघराण्यात आल्यावर शस्त्रांचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं होतं.

१८व्या शतकाच्या मध्यापर्यंत ब्रिटिशांनी भारतात साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करून संस्थाने खालसा करण्याचा सपाटा लावला. इतर संस्थानांप्रमाणेच इंग्रजांना अवध संस्थानही ताब्यात घ्यायचे होते. बेगम या अत्यंत स्वाभिमानी होत्या. नवाबचे राज्यकारभारात फारसे लक्ष नव्हते, त्यामुळे बेगम यांनी स्वतः राज्यकारभार सांभाळण्याचा निर्णय केला. मात्र याचदरम्यान अवधवर हल्ला करून नवाब वाजिद अली शाह यांना ब्रिटिशांनी नजरकैद करून त्यांची कलकत्त्याला रवानगी केली. लखनऊ सोडायच्या आधी नवाब वाजिद अली यांनी बेगम यांना घटस्फोट दिला होता. त्यांचे दुःख बेहम यांच्या मनात होतेच !

१० मे १८५७ रोजी मेरठमधील छावणीमध्ये स्वातंत्र्ययुद्धाचा वणवा पेटला. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बहादुरशाह जफर या सर्व योद्धांसोबत हजरत महल यांनी इंग्रजांविरुद्ध मोहीम राबविण्याची तयारी केली. अखंड भारतात चहूबाजूंना सशस्त्र उठाव करण्यात आले. १८५७च्या स्वातंत्र्य युद्धाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर तात्या टोपे करत होते, तर बहादुरशाह जफर यांना दिल्लीच्या तख्तावर विराजमान करण्यात आले.

लखनौमधील उठावाचे नेतृत्व स्वतः बेगम हजरत महल करत होत्या. मंगल पांडे हुतात्मा झाल्यानंतर मेरठ, कानपूर आणि दिल्लीमध्ये आधीच बंडाची आग उसळली होती.ब्रिटिशांसोबत लढण्यासाठी बेगम यांनी सैन्याची जमवाजमव केली आणि त्यांनी ब्रिटिशांच्या लखनौमधील सैनिकी छावणीवर हल्ला करण्याची योजना आली. यावेळी बेगम हजरत महल सुद्धा सैन्यासोबत युद्धात सहभागी झाल्या. स्वातंत्र्यसैनिकांनी लखनौमधून ब्रिटिशांची जवळजवळ हकालपट्टी झाली. त्वेषाने पेटलेल्या क्रांतीकारी सैन्याने कैदेत असलेल्या सर्व ब्रिटिशांची कुटुंबियांसमवेत हत्या केली. महत्त्वाचे म्हणजे या हल्ल्यात लखनऊचे चीफ कमिश्नर हेन्री लॉरेन्स यांचाही मृत्यू झाला.

या प्रकारामुळे चिडलेल्या ब्रिटिशांनी प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजांनी लखनौवर पुन्हा हल्ला केला आणि लखनौवर ताबा मिळविला. इंग्रजांच्या कडव्या हल्ल्यापुढे क्रांतिकारी सैन्याला अखेर माघार घेण्याची वेळ आली. बंडखोरी करणाऱ्या सैन्याच्या पीछेहाटीमुळे बेगम यांना नेपाळमध्ये आसरा घ्यावा लागला. इंग्रज आपल्याला पकडतील अशी शक्यता वाटू लागली, तेव्हा बेगम यांनी नेपाळमध्येच आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.

काठमांडू (नेपाळ) मधील बेगम हजरत महल यांची समाधी

नेपाळच्या सरकारकडून काहीतरी मदत मिळेल अशी त्यांना आशा होती, मात्र दुर्दैवाने नेपाळच्या राजाने ऐनवेळी मदत करण्याचे नाकारले, तसेच नेपाळमध्ये हिंसाचार करण्यासदेखील त्यांना मनाई केली. त्यांचा अयोध्या प्रांतदेखील इंग्रजांनी बळकावला होता. १८७९ पर्यंत त्या नेपाळमध्येच राहिल्या. विशेष म्हणजे १८५७च्या स्वातंत्र्य समरात इंग्रजांच्या तावडीत न सापडणाऱ्या अशा त्या एकमेव योद्धा होत्या. १८७९ साली नेपाळची राजधानी काठमांडू इथे या महान विरंगनेचे निधन झाले. काठमांडूच्या जामा मस्जिद येथे त्यांना दफन करण्यात आले. इंग्रजांचा थेट सामना केला, त्यामुळे तत्कालीन इतिहासाने त्यांचा पराक्रम झाकोळला गेला. बेगम यांच्यासारख्या अनेक योद्धा आहेत, ज्यांना इतिहासात मानाचं स्थान मिळालं नाही, मात्र आता अशा सर्व महिला योद्धांचा इतिहास अभिमानाने पुढे आणण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायलाच हवा.

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Vikrant Jadhav
Vikrant Jadhav
1 year ago

खुप छान लेख