You are currently viewing क्रांतीपथावरील अग्निशलाका  – दुर्गाभाभी

क्रांतीपथावरील अग्निशलाका  – दुर्गाभाभी

हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) संघटनेमधील चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरु, सुखदेव हे सर्व क्रांतीकारी आपल्या परिचयाचे आहेतच. पण, या सर्व थोर क्रांतिवीरांच्या वलयात एक जीवनपुष्प हरवून गेले, ज्यांनी आपले संपूर्ण तारुण्य भारतीय क्रांतीसंग्रामासाठी वाहून दिले. ब्रिटीश अधिकारी सॉंडर्सच्या हत्येनंतर लाहोर प्रशासन खडबडून जागे झाले, सगळीकडे स्थानीक पोलीस आरोपींचा शोध घेत होती. अशा वेळी भगतसिंह आणि राजगुरूंना लाहोर मधून सुखरूप रीतीने पलायन करण्यासाठी एका विरांगनेने मदत गेली. आज आपल्या क्रांतिपथावरील अग्नीशलाका या लेखमालेत अशाच एका क्रांतीविरांगनेची माहिती आपण जाणून घेणार आहोत ज्यांचं नाव आहे, दुर्गादेवी वोहरा अर्थात दुर्गा भाभी !

दुर्गाभाभी
दुर्गाभाभी

दुर्गादेवींचा जन्म ७ ऑक्टोबर १९०७ रोजी अलाहाबादमधील एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील अलाहाबाद आयुक्तालयात नोकरीवर होते. वयाच्या १०व्या वर्षी दुर्गादेवी यांचा विवाह लाहोरमधील भगवती चरण वोहरा यांच्यासोबत झाला. भगवती चरण वोहरा हेदेखील सधन कुटुंबात जन्मले होते, त्यांचे वडील शिवचरण वोहरा रेल्वे खात्यात मोठ्या पदावर नोकरीला होते, तसेच त्यांना ब्रिटिश सरकारने मानाचा “रायबहाद्दूर ” किताब दिला होता.

दुर्गाभाभी
भगवती चरण वोहरा, दुर्गाभाभी आणि त्यांचा मुलगा सची

भगवती चरण वोहरा आणि दुर्गभाभी दोघेही श्रीमंत असले तरीही ब्रिटिश सरकार विरोधात दोघांच्या मनात विरोध खदखदत होता. १९२० साली वडिलांच्या निधनानंतर भगवती चरण पुर्णतः क्रांतिकारी पथावर मार्गस्थ झाले. १९२६ साली भगवती चरण वोहरा, रामचंद्र कपूर आणि भगतसिंह यांनी मिळून नौजवान भारत सभेची स्थापना केली. सायमन कमिशन भारतात आल्यावर सबंध भारतातून विरोध होऊ लागला, लाहोरमध्ये सायमन कमिशनचा विरोध करताना झालेल्या लाठीचार्जमध्ये पंजाब केसरी लाला लजपत राय गंभीर जखमी झाले आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यु झाला. लालाजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लाहोरमध्ये क्रांतिकारकांची सभा भरवण्यात आली. सभेचे नेतृत्व स्वतः दुर्गभाभींनी केले, याच सभेत लालाजींवर लाठीचार्ज करणारा ब्रिटिश अधिकारी जेम्स स्कॉटच्या हत्येची योजना तयार करण्यात आली.

दुर्गाभाभी
दुर्गाभाभी (डावीकडे)

१७ डिसेंबर रोजी क्रांतिकारकांनी ललाजींच्या हत्येचा प्रतिशोध घेतला खरा पण नजरचुकीने स्कॉटऐवजी साँडर्स ठार झाला. भर दिवसा घडलेल्या या हत्येने इंग्रज सरकार चा पारा चढला आणि लाहोरमध्ये सगळीकडे क्रांतीकारकांची धरपकड चालू झाली. भगतसिंह आणि राजगुरु दोघांना लाहोरमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी दूर्गभाभी पुढे आल्या. २० डिसेंबर रोजी सर्वांनी वेषांतर केले, भगतसिंह सूट बुट घालून तर दुर्गाभाभी महागडी साडी घालून आपल्या तीन वर्षांचा मुलगा “शची” सोबत टांग्यात बसल्या, राजगुरू नोकराच्या वेशात होता. भगत सिंह यांनी स्वत:चे नाव रणजित तर दुर्गाभाभी यांनी सुजाता नाव धारण केले होते. सर्वजण सुखरूप लाहोर मधून निसटून कलकत्त्यास पोहोचले.

८ एप्रिल १९२९ रोजी भगत सिंह व बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत बॉम्ब टाकले आणि दोघांना कैद झाली. मुळात हा बॉम्ब हल्ला कोणालाही जखमी करण्याच्या उद्देशाने नसून बहिऱ्या ब्रिटिश सरकारला जागं करण्यासाठी होता. पुढील काळात झालेल्या तपासणीत राजगुरू, शिव वर्मा, सुखदेव आणि बरेच क्रांतीकारी पकडले गेले. भगतसिंह संघटनेचे एक प्रमुख क्रांतिकारी असल्यामुळे क्रांतीकारकांना सोडवण्यासाठी चंद्रशेखर आझाद दिवसरात्र झटत होते.

योजनेनुसार भगतसिंहा यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी बॉम्बचा वापर केला जाणार होता. चंद्रशेखर आझाद आणि भगवती चरण वोहरा दोघांनी ही योजना आखली होती. २८ मे १९३०च्या रात्री परीक्षण करताना बॉम्ब भगवती चरणांच्या हातात फुटला आणि यामध्ये भगवती चरण वोहरा हुतात्मा झाले. दुसरीकडे, आझाद बहावलपूरमध्ये क्रांतिकारकांच्या गुप्त ठिकाणी उपस्थित होते. एकाच रात्रीत दुर्गभाभींचा संसार उद्ध्वस्त झाला होता, वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी त्यांचा पती स्वातंत्र्याच्या आगीत जळून खाक झाला होता. ऑक्टोबर १९३० मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी दुर्गाभाभी व सुखदेव यांवर मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅली ची हत्या करण्यास पाठवले. यावेळी दुर्गा भाभींनी ब्रिटीश सार्जेंट टेलर याच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये तो जखमी झाला.

२३ मार्च १९३१ रोजी क्रांतिकारी भगतसिंह, सुखदेव, राजगुरू या तिघांनाही फाशी झाली. चंद्रशेखर आझाद आधीच अल्फ्रेड पार्क मधील गोळीबारात हुतात्मा झाले होते. हे सर्व घडलं आणि दुर्गाभाभी एकट्या पडल्या. १२ सप्टेंबर १९३१ रोजी लाहोरमध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि यानंतर तीन वर्ष त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. १९४० साली त्यांनी लखनौ मॉन्टेसरी स्कूलची स्थापना केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या इमारतीचे उद्घाटन केले आणि आजही ही संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. १५ ऑक्टोबर १९९९ रोजी गाझियाबादमध्ये ही महान वीरांगना भारतभूमीला सोडून गेली.

दुर्गाभाभी
दुर्गाभाभी

दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर गांधीजींसोबत निव्वळ दांडीयात्रेत सहभागी झालेल्यांचे देखील सन्मान करण्यात आले होते. मात्र भगतसिंह आणि इतर क्रांतिकारकांच्या अटकेनंतर त्यांचा सुटकेसाठी स्वतःचे मंगळसूत्र आणि दागिने गहाण ठेवणाऱ्या, श्रीमंत कुटुंबात जन्माला येऊनही स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन हलाखीत काढणाऱ्या दुर्गाभाभी मात्र अनामिकच राहील्या. दुर्गाभाभींच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन !

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Vikrant Jadhav
Vikrant Jadhav
1 year ago

खुप छान लेख