यह सच उनके जीवन में भी रंगीन बहारें आई थीं,
श्रीकृष्ण सरल
जीवन की स्वप्निल निधियाँ भी उनने जीवन में पाई थीं,
पर, माँ के आँसू लख उनने सब सरस फुहारें लौटा दीं,
काँटों के पथ का वरण किया, रंगीन बहारें लौटा दीं।
स्वातंत्र्य…!
आपल्यासाठी हा केवळ तीन – साडेतीन अक्षरांचा शब्द. पण, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अगणित विभूतींनी आपले सुखकर जीवन त्यागून क्रांतीच्या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली. स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा भगतसिंह ही नावे आपल्या नित्य परिचयाची असतातच पण स्वातंत्र्यसंग्रामातील स्त्री क्रांतिकारकांचे कर्तुत्व आजही इतिहासाच्या अंधारलेल्या पानांमध्ये हरवून गेले आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी परदेशात राहून अमूल्य योगदान देणाऱ्या मादाम भिकाजी कामा यांची माहिती पोहोचवण्यासाठी हा प्रपंच …

भिकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबईत एका सधन पारशी कुटुंबात झाला होता. त्यांचे मूळ नाव भिकाजी सोराबजी पटेल होते, तर वडील सोराबजी पटेल हे मोठे व्यापारी होते. त्यांचे शिक्षण अलेक्झांड्रा गर्ल्स नेटिव्ह इन्स्टिट्युट मधून इंग्रजी माध्यमात पूर्ण झाले. इ.स १८८५ रोजी भिकाजी यांचा विवाह रुस्तुम कामा यांसोबत झाला. १८८६ साली मुंबईला प्लेगच्या साथीने घेरले, चोहीकडे हाहाकार माजला होता. साथीच्या काळात प्लेगने ग्रस्त रोग्यांची सेवा, सुश्रुषा भिकाजी कामा यांनी सढळ हाताने केली, रोग्यांची सेवा करता करता त्यांनाही प्लेगची लागण झाली, पण त्या बचावल्या आणि शारीरिक विश्रांतीसाठी लंडनला रवाना झाल्या.
परदेशात जाऊनही भिकाजी कामा स्वस्थ बसून राहिल्या नाहीत. लंडनमध्ये त्यांची भेट पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाळ, दादाभाई नौरोजी यांसारख्या क्रांतीकारी विचारधारेच्या व्यक्तींसोबत झाली. लंडनमध्ये काही काळ दादाभाई नौरोजी यांच्या सेक्रेटरी पदाचे काम भिकाजी कामांनी पाहिले. पुढील काळात फ्रान्स, हॉलंड यांसारख्या विविध देशांत जाऊन भिकाजी कामांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. भिकाजींनी होमरूल चळवळीतदेखील सक्रिय सहभाग घेतला, “वंदे मातरम्” या वृत्तपत्रातून विविध लेखांद्वारे क्रांतीचे विचार परदेशात पोहचवण्याचे तसेच अन्यायकारी ब्रिटीश सरकारवर टीका करण्याचे काम त्यांनी चालू केले.

२२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीत आंतरराष्ट्रीय सामजिक परिषद भरली होती. परिषदेत प्रथमच भिकाजी कामा यांनी भारताचा झेंडा फडकवला. हा झेंडा स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आणि भिकाजी कामा तिघांनी मिळून तयार केला होता. झेंड्यात हिरवा, पिवळा आणि लाल असे रंगाचे पट्टे होते. यातील हिरवा रंग उत्साहाचे, पिवळा रंग विजयाचे तर लाल रंग शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. झेंड्यावरील हिरव्या पट्ट्यात ८ कमळाची फुले, तत्कालीन भारतातील ८ राज्यांचे प्रतिनिधित्व करतात, तर लाल पट्ट्यात सूर्य – चंद्र विराजमान असून मध्यभागी देवनागरी मध्ये “वन्दे मातरम्”लिहिले आहे. झेंडा फडकवत असताना आपल्या भाषणात भिकाजी कामा म्हणाल्या होत्या_
“माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरून फडकवीत आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणाऱ्या या परिषदेतील सदस्यांना स्वतंत्र हिंदुस्थानाचे मानचिन्ह असणारा हा तिरंगा आव्हान देत येथे फडकत आहे. या ध्वजाला प्रणाम करा.”

(हा ध्वज सध्या पुण्यातील लोकमान्य टिळक संग्रहलयात जतन करून ठेवण्यात आला आहे.)
ब्रिटीश सरकारने १८५७ च्या उठावाला निव्वळ शिपायांचे बंड म्हणवून दाबून टाकले होते. मे १९०७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंडिया हाऊस मध्ये १८५७ च्या उठावाचा सुवर्ण महोत्सवी उत्सव साजरा केला. इंडिया हाऊस मध्येच सावरकरांनी “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” या पुस्तकाचे लिखाण केले, हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मादाम भिकाजी कामा यांनी मदत केली होती. नाशिकमधील क्रांतीकारी अनंत कान्हेरे यांनी जिल्ह्याचा आयुक्त जॅक्सनची हत्या केली. सावरकरांनी लंडनहून आपल्या भावाला पाठवलेल्या बंदुकीचा वापर जॅक्सनच्या हत्येसाठी करण्यात आल्याचा आरोप ब्रिटिशांनी सावरकरांवर लावून त्यांना लंडनमध्ये अटक केली. ‘एसएस मौर्य’ नावाच्या जहाजावरून सावरकरांना भारतात आणलं जात होतं. जहाज जेव्हा फ्रान्समधील मार्सेलिस बंदरामध्ये थांबलं होतं तेव्हा सावरकरांनी शौचालयातील पोर्ट होलमधून समुद्रामध्ये उडी मारली. किनारा गाठल्यावर सावरकरांना तेथून पळवून नेण्याची योजना ठरली होती. पण मादाम कामा आणि विरेंद्रनाथ चटोपाध्याय किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वीच इंग्रज शिपायांनी सावरकरांना किनाऱ्यावरून पकडून नेले आणि योजना फसली.
सावरकरांना अटक झाल्यावर मादाम कामांना खूप वाईट वाटले; पण त्या शांत बसल्या नाहीत. त्यांनी मार्सेलिसचे महापौर जीन जोरे यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. ब्रिटिश पोलिसांनी सावरकरांना फ्रेंच भूमीवर केलेली अटक हा फ्रान्सचा अपमान असल्याचेही त्यांनी जोरे यांना सांगितले आणि त्यांनीच ही बातमी पॅरिसच्या ‘ले तान’ या वृत्तपत्राला पाठवली. सावरकररांना बेकायदेशीररीत्या तुरुंगात टाकण्यात आल्याची बातमी पसरताच संपूर्ण जगात खळबळ माजली आणि इंग्रज राजवटीला अत्यंत शरमेने मानहानीला सामोरे जावे लागले. या घटनेनंतर ब्रिटीश सरकार सावरकरांवर अत्यंत निर्दयीपणे खटला चालवणार हे जाणून, मादाम कामा यांनी मुंबईतील वकील जोसेफ बाप्टिस्टा यांना एक तार पाठवून सावरकरांना भेटण्यास सांगितले. एवढंच नाही तर यानंतर मादाम कामा स्वतः थेट पॅरिसमधील ब्रिटिश दूतावासात गेल्या आणि तिथल्या राजदूताला लेखी निवेदन दिले, ज्यात त्यांनी लिहिले होते की, “पिस्तूल भारतात पाठवण्याची जबाबदारी सावरकरांची नाही, तर मी जबाबदार आहे. मीच ते पिस्तूल चतुर्भुज अमीनसोबत भारतात पाठवले होते.” मादाम कामा यांच्यातील संयम, धैर्य आणि देशभक्ती भरलेली होती, याची प्रचिती या प्रसंगातून येते.

सशस्त्र क्रांतीकारी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याने ब्रिटीश सरकारने मादाम कामा यांची भारतातील सर्व संपत्ती जप्त केली होती. १९०९ साली कामा फ्रान्स मध्ये स्थलांतरित झाल्या. हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीची गोळ्या झाडून हत्या केली, या प्रकरणात मदनलाल धिंग्राना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सप्टेंबर १९०९ मध्ये हुतात्मा मदनलाल धिंग्राच्या स्मृतीप्रीत्यर्थ ममादाम कामा यांनी “मदन तलवार” नामक नियतकालिकाची सुरूवात केली. १९३५ सालापर्यंत मादाम कामा फ्रान्समध्येच होत्या. वृद्धावस्थेत १९३६ साली मॅडम कामा भारतात परतल्या, १३ ऑगस्ट १९३६ रोजी मुंबईमधील पारशी जनरल हॉस्पिटल मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज अनेक जण या नावापासून अनभिज्ञ आहेत, मात्र आम्ही अशा सर्व क्रांतीविरांगनाचा इतिहास आमच्या नवदुर्गा उपक्रमाद्वारे जिवंत ठेवू !
मादाम भिकाजी कामा यांना विनम्र अभिवादन !
Do not forget the important role of women play in building a nation. -Madam Bhikaji Cama
संदर्भ:-
- आजादी के दिवाने (प्रमोद मांडे)
- ‘क्रांतिपर्व’ – महाराष्ट्र शासन
खुप छान लेख
धन्यवाद !