प्रितीची ना भूक लागे, काय सांगू मी तुला गे ?
माधव ज्युलियन
प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी !
हुतात्मा भगत सिंह म्हटलं तर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला सशस्त्र क्रांतीचा पर्व ! भगत सिंह यांनी क्रांतीची व्याख्याच बदलून टाकली. आजही त्यांचे विचार आणि त्यांचा संघर्ष युवकांना प्रेरणा देत आहे. अनेकांना ही गोष्ट माहित नसावी की, भगत सिंह यांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली? तर उत्तर आहे, त्यांच्या संपूर्ण कुटुंबानेच स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. भगत सिंह यांचे आजोबा सरदार अर्जुन सिंह मोठे देशभक्त होते, ज्यांनी आपल्या मुलांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटवली. भगत यांचे काका स्वातंत्र्य सेनानी स्वर्ण सिंह यांना ब्रिटिशांनी अटक केली होती, वयाच्या २३व्या वर्षी त्यांचे मंडाले तुरुंगात निधन झाले. भगत यांचे वडील सरदार किशन सिंह अनेक चळवळींमध्ये सक्रिय होते. तर त्यांचे दुसरे काका क्रांतिकारक अजित सिंह यांनी तर आपलं संपूर्ण आयुष्य मातृभूमीसाठी वेचलं.

पण भगत सिंह यांच्या समर्पित कुटुंबात फक्त पुरुषांनीच योगदान दिलं नाही तर स्त्रियांचाही मोलाचा वाटा होता. आपलं पोटचं मुलं फासावर जात असताना ‘आखरी बार इन्कलाब जिंदाबाद जरूर बोलना’ असं सांगणाऱ्या भगत यांच्या आई माता विद्यावती कौर यांच्यासारखं मातृत्वाने आणि कर्तृत्वाने काठोकाठ भरलेलं व्यक्तिमत्त्व शोधूनही सापडणार नाही. भगत यांच्या आजी जय कौर यांनीही अनेक क्रांतीकारकांना मदत केली होती. मात्र भगत यांच्या कुटुंबात एक अशी व्यक्तीही होती, ज्यांच्याबद्दल आजपर्यंत कधीही बोललं गेलं नाही. त्या म्हणजे सरदार अजित सिंह यांच्या अर्धांगिनी आणि भगत सिंह यांच्या काकी माता हरनाम कौर ! त्यांचा स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी याच काळात असीम प्रेमाचं आणि त्यागाचं उदाहरण त्यांनी सर्वांसमोर ठेवलं आहे. आज या लेखात त्यांच्या संघर्षाबाबत जाणून घेऊयात.
हरनाम कौर यांचा जन्म १८८८ रोजी झाला होता. अगदी बालपणीच आई-वडिलांचं छत्र हरवल्यामुळे त्या कधीही आपल्या जन्मदात्यांना पाहू शकल्या नाहीत. त्यांचे काका धनपतराय आणि त्यांच्या पत्नीने हरनाम यांना सांभाळलं, मोठं केलं. वयात आल्यानंतर त्यांचा विवाह लायलपुरच्या अजित सिंह यांच्यासोबत करण्यात आला. आपला पती स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय आहे आणि आपण स्वतः एका अशाच कुटुंबात आलोय, याची जाण त्यांना होती. मात्र देशासाठी कार्य करणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आपणसुद्धा आपलं योगदान द्यावं, असा प्रण त्यांनी केला होता. कुटुंब फार मोठं होतं. सर्व गुण्यागोविंदाने राहत होते. मात्र अजित सिंह कधीतरीच घरी असायचे. अनेक आंदोलनांमध्ये आणि क्रांतिकारी मोहिमांमध्ये सहभागी असल्यामुळे पोलीस सदैव त्यांच्या मागावर असायचे.
१९०७ साली त्यांच्या घरात एका भागावालाचा जन्म झाला. देशासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या सिंह घरात एका महान क्रांतिकारीचा जन्म झाला होता. एक असा क्रांतिकारक ज्यांच्या जन्मामुळे आणि हौतात्म्यामुळे देशाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. त्यांचं नाव होतं सरदार भगत सिंह ! घरात आनंदाचं वातावरण होतं. हरनाम यांना अपत्य नव्हतं, अजित सिंह क्वचितच घरी यायचे. प्रत्येक स्त्रीला आपलं एक स्वतःचं मूल असावं, अशी अपेक्षा असते. पण अजित सिंह यांच्या देशकार्यापुढे त्यांनी आपल्या या स्वप्नाची राखरांगोळी केली आणि भगत यांनाच आपला पुत्र मानून आईप्रमाणेच हरनाम यांनी त्यांचा सांभाळ केला. आपलं दुःख पचवून देशकार्याच्या वातावरणात त्या समरस झाल्या.
एके दिवशी अजित सिंह यांना ब्रिटिश तुरुंगात डांबणारा असल्याची माहिती हरनाम यांना कळली. त्यामुळे त्यांनी क्रांतिकारक सुफी अंबा प्रसाद यांच्यासोबत परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. आवंढा गिळत त्यांनी पती अजित सिंह यांना विचारलं, ‘तुम्हाला पोलीस पकडणार आहेत असं ऐकलं. त्यात तुम्ही बाहेर जात आहात. मग परत कधी येणार ?’… यावर अजित सिंह थेट उत्तरले, ‘तू खयाल रख, मैं परसों या जाऊंगा !’ इतकं ऐकल्यानंतर हरनाम यांच्या मनात सुरू असलेली घुटमळ काहीशी थांबली. अजित सिंह निघाले आणि थेट परतले ३८ वर्षानंतर ! जो परवा हरनाम यांच्या आयुष्यात दोन दिवसांनी यायला हवा होता, तो ३८ वर्षानंतर आला. अजित सिंह हे सुफी अंबा प्रसाद यांच्यासोबत ३८ वर्ष इराणमध्ये लपून राहिले. याशिवाय इतर देशांमध्येही ते प्रवास करत राहिले. इतकी वर्ष आपल्या पतीविना त्या त्यागी स्त्रीने कशी काढली असावीत, हा विचार करूनच मनात दुःखाचं वादळ उठतं.

या ३८ वर्षांत अजित सिंह यांच्याबद्दल अनेक वावड्या उठल्या होत्या. कित्येकदा त्यांच्या मृत्यूची बातमीसुद्धा आली होती. मात्र अशा अफवा पचवून आपले पती जिथे आहेत, तिथे सुखरूप असतील ही भावना मनात ठेऊन हरनाम जगत राहिल्या. एकदा अजित सिंह यांचा ब्राझीलमध्ये असल्याचा पत्ता हरनाम यांना मिळाला. त्यामुळे कसलाही विचार न करता त्यांनी अजित सिंह यांना पत्र लिहिलं, त्यात त्यांनी विचारलं, ‘आपने तो परसों आने का वादा किया था, आज तो बरसों बित गए है, पर आप नहीं आए ! यावर ऊत्तर म्हणून सरदार अजित सिंह यांनी लिहिले, ‘परसों और बरसों में सिर्फ दो नुक्तो का ही फर्क है ! (याच अर्थ परसों आणि बरसों या दोहोंमध्ये केवळ दोन टिंबाचा फरक आहे.
यानंतर ३८ वर्षांनी अखेर अजित सिंह भारतात परतले, सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या. आपल्याच डोळ्यांसमोर जन्मलेला भगत सिंह एक मोठा क्रांतिकारी होऊन त्याने अवघ्या २३व्या वर्षी या भारतभूमीसाठी बलिदान दिलं होतं. कराचीहून घरी न जाता ते प्रथम दिल्लीला गेले. भारतात परतल्यानंतरही ते आपल्या पत्नीची भेट घेण्यासाठी गेले नाहीतर तर आपल्या मायभूमीसाठी दिल्लीत जाऊन पुन्हा राष्ट्रकार्यात सामील झाले. राष्ट्रकार्य करताना आपल्या संसाराची होळी करणाऱ्या पतीची इतक्या उत्कटतेने, आशेने आणि निष्ठेने वाट पाहणारी त्यागमयी केवळ आणि केवळ भारतातच जन्म घेऊ शकते. ज्या दिवशी भारत स्वातंत्र्य झाला त्याच दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी सरदार अजित सिंह यांचं निधन झालं. भारतमातेचा सुपुत्र तिच्या कुशीत निजला. हरनामी कौर पुन्हा एकदा एकट्या पडल्या. पण आपल्या मृत्यूनंतर आपला अंत्यविधी ज्याठिकाणी भगत सिहं यांचा अंत्यविधी झाला तिथेच करण्यात यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर त्यांचा अंत्यविधीदेखील फिरोजपूर येथे करण्यात आला.
या भारताच्या स्वातंत्र्यासाठी सिंह कुटुंबाची अक्खी पिढी गेली. पण कोणीही कधीही कसलीही अपेक्षा केली नाही. या सिंह कुटुंबाला आणि त्यागी माता हरनामी कौर यांना विनम्र अभिवादन !
इन्कलाब जिंदाबाद…!
खुप छान लेख
धन्यवाद !