दम निकले इस देश की खातीर बस इतना अरमान है एक बार इस राह में मरना सौ जन्मों के समान है !
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या अनेक शूरवीरांच्या कथा ऐकल्या आहेत. शेकडो महापुरुषांनी आपल्या प्राणांची बाजी लावून आणि वेळप्रसंगी आपले प्राणार्पण करून या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्रखर लढा दिला. याच स्वातंत्र्यलढ्यात अनेक अशा वीरांगनादेखील होत्या, ज्यांचा इतिहास फारसा भारतीयांपर्यंत पोहोचू शकला नाही. आजच्या आपल्या नवदुर्गाच्या या तिसऱ्या पर्वाच्या पहिल्या पुष्पात आपण स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात स्वतःला झोकून देणाऱ्या ‘गांधी बुढी’चा इतिहास जाणून घेणार आहोत.

महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात महान नावांपैकी एक ! अनेक क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, नागरिकांनी त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन भारताच्या या लढ्यात विशेष योगदान दिलं. गांधीजींपासून प्रेरित होऊनच स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणारी एक अशी स्त्री होऊन गेली, जीचं नाव क्वचित जणांनी ऐकलं असेल. प्राण गमावले पण हातातला तिरंगा सोडला नाही, त्या बंगाली वीरांगनेचे नाव होतं मातंगिनी हाजरा ! भारताच्या इतिहासामध्ये दुर्लक्षित राहिलेल्या या महान स्त्रीबद्दल आज आपण जाणून घेऊया.
मातंगिनी हाजरा यांचा जन्म १९ ऑक्टोबर १८७० रोजी बंगालच्या तमलूकजवळील होगला या गावात झाला. ग्रामीण भारत त्यातच स्वातंत्र्यपूर्व काळ, त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि याच परिस्थितीमुळे त्या बालविवाहाला बळी पडल्या. त्यातही हुंडा देणंही शक्य नसल्यामुळे मातंगिनी यांचा विवाह अवघ्या १२व्या वर्षी मेदिनीपूरमधील अलिनान गावातील तब्बल ६० वर्षांच्या त्रिलोचन हाजरा यांच्याशी करण्यात आला. आपल्या योग्य वयात येण्यापूर्वीच त्यांच्या पतीचं निधन झालं. कोवळ्या वयातच कसला आधार नसलेली ती स्त्री जीवनाच्या संघर्षासाठी कशीबशी प्रयत्न करू लागली. मोलमजुरीचं काम मिळाल्यानंतर आपल्या वेगळ्या झोपडीत त्या एकट्या राहू लागल्या.
जेव्हा आपल्याला आधार नसतो तेव्हा आपण दुसऱ्या कोणाचातरी आधार व्हावं, यासाठी पुढाकार घेत मातंगिनी या गावकऱ्यांच्या सुखदुःखात सामील व्हायला लागल्या. जमेल तशी लोकांची मदत करून त्यांनी गावातल्या लोकांचा विश्वास जिंकला आणि अखेर त्यांना आईचं पद मिळालं. गावतली सर्व लोकं त्या ‘माँ’ म्हणायला लागले. त्याकाळी भारताचा स्वातंत्र्यलढ्याला एक शक्तीशाली वलय प्राप्त झालं होतं. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक वीर स्वातंत्र्यासाठी पुढे येत होते. याचदरम्यान त्यांनीही महात्मा गांधीजींचे विचार आत्मसात केले आणि ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले.
विशेष म्हणजे मातंगिनी या वयाच्या साठीमध्ये पोहोचल्यावर स्वातंत्र्यलढ्यात उतरल्या होत्या. ज्या वयात अनेक जण आपलं आयुष्य नातवंडांसोबत घालवण्याचं स्वप्न पाहतात, तेव्हा मातंगिनी या राष्ट्रकार्यात उतरल्या आणि अनेक चळवळींचं त्यांनी नेतृत्व केलं. दांडी यात्रेतही त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सहभाग घेतला. सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. हा त्यांचा पहिलाच तुरुंगवास होता, मात्र तरीही त्या डगमगल्या नाहीत. याच काळात त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सक्रिय सदस्य झाल्या आणि गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवले. १९३३ साली त्यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या ‘करबंदी आंदोलन’ हाणून पाडण्यासाठी बंगालचे तत्कालीन गव्हर्नर अँडरसन त्यांच्या तमलूक या गावात आले होते, त्यावेळी त्यांनी सर्व आंदोलनकर्त्यांसह या जुलुमी कायद्यांचा कडाडून विरोध केला. ब्रिटिश सरकारच्या विरोधात घोषणा दिल्याबद्दल आणि आंदोलन केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आणि मुर्शिदाबाद तुरुंगात सहा महिन्यांसाठी ठेवण्यात आलं होतं.
१९३५ दरम्यान तामलूक येथे महापूर आला होता. यामुळे संपूर्ण क्षेत्रात कॉलरा आणि कांजण्यांची साथ पसरली होती. यावेळी कसलीही पर्वा न करता लोकांना जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि शक्य तितक्या रुग्णांना उपचार देण्यासाठी सुविधा उपलब्ध केली. मातंगिनी या गांधीजींप्रमाणे राहायचा. त्यासुद्धाअ खादी, स्वदेशी कापडांचा वापर करायच्या, सूत कातायच्या, प्रत्येक आंदोलनात हिरीरीने सहभाग घ्यायच्या. यासाठीच त्यांना ‘ओल्ड लेडी गांधी’ आणि ‘गांधी बुढी‘ अशी ओळख मिळाली होती.
ऑगस्ट, १९४२ मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वातील भारत छोडो आंदोलनाला गती प्राप्त झाली होती. देशभरातून स्वातंत्र्यसैनिक नागरिक रस्त्यावर उतरले होते. भारतभर व्यापक स्तरावर ही चळवळ सुरु झाली होती. तामलूक गावातील अनेक लोकं यावेळी रस्त्यावर उतरले होते. यावेळी ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रदर्शन सुरू असताना ८ सप्टेंबर १९४२ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३ स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले. याचाच विरोध म्हणून मातंगिनी यांनी २९ सप्टेंबर १९४२ रोजी आपल्या गावात फिरून मोठ्या संख्येने लोकांना जमवलं. आपल्या तुमलूक या केलं ६ हजार लोकांच्या मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केले आणि वंदे मातरम् घोषणा देत ब्रिटिशांच्या जुलुमी राजवटीचा विरोध केला. सर्वजण तुमलूक पोलीस स्थानकाबाहेर जमा झाले होते. यावेळी सुरुवातीला मातंगिनी यांनी पोलिसांना गोळीबार आणि लाठीहल्ला न करण्याची विनंती केली होती, कारण हा केवळ निषेध मोर्चा होता आणि यात कोणताही हिंसाचार योग्य नव्हता. मात्र तरीही क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या मोर्चावर थेट गोळीबार करण्याचेच आदेश दिले.
पोलिसांच्या या कृत्याचा प्रतिकार करण्यासाठी हातात केवळ आणि केवळ तिरंगा होता. पोलिसांकडून गोळीबार सुरू झाला. मात्र तरीही त्या शरण गेल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. तिरंगा घेऊन त्या चालतच राहिल्या. सुरुवातीला एक गोळी त्यांच्या हाताला लागली, मात्र तरीही त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्या पुढे सरसावल्या. मात्र एवढ्यात क्रूर पोलिसांनी त्यांच्या छातीवर आणि डोळ्यावर गोळ्या झाडल्या आणि ७३ वर्षांची ती वीरांगना धारातीर्थी पडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मातंगिनी यांच्या हातात अजूनही तिरंगा तसाच होता. स्वातंत्र्य मिळवण्याची जिद्द हीच असते. साम्राज्यवादाविरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढणं हे भारतीयांच्या रक्तातच आहे, हे मातंगिनी यांनी सर्वांना दाखवून दिलं.
हुतात्मा मातंगिनी हाजरा यांना कोटी कोटी अभिवादन !
खुप छान लेख
धन्यवाद !