भारतीय स्वातंत्र्यसमरात लढलेल्यांचे मुख्यत्वे दोन गट पडतात. अहिंसा, शांततेवर विश्वास ठेवणारा, मूलतः वयस्कर गट म्हणजे मावळ गट तर दुसरीकडे राष्ट्रस्वातंत्र्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व नितीमुल्यांवर विश्वास ठेवणारा, प्रसंगी मरण्यास वा मारण्यास तत्पर असलेला तरुण क्रांतिकारकांचा जहाल गट…!
तुझे जिबह करने की खुशी और मुझे मरने का शौक है…
हुतात्मा भगत सिंह
मेरी भी मर्जी वही है, जो मेरे सय्याद की है |
भगतसिंग !हे साधं नाव जरी कानी पडल तर आपल्यासमोर उभा राहतो संसदेतील बॉम्ब हल्ल्यात, साँडर्स च्या हात्येत सामील असलेला, अवघ्या तेविसाव्या भारत मातेसाठी हसत हसत फाशीची शिक्षा पत्करलेला वेडा तरुण. या भारतमातेच्या पोटी भगतसिंग, शांती घोष, सूनिती चौधरी यांसारख्या अगणित विभूती जन्माला आल्या ज्यांच्या बलिदानाने मातेची कुस पावन झाली. दुर्दैवाने आजच्या इतिहासाला त्यांपैकी बरीच नावं आज्ञात आहेत, आज आपण वयाच्या केवळ सतराव्या वर्षी स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळी खाणाऱ्या एका वीर तरुणीची जीवनगाथा पाहणार आहोत.

कनकलता बरुआ यांचा जन्म 22 डिसेंबर 1924 रोजी कृष्णा कांता आणि कर्णेश्वरी बरुआ यांच्या पोटी बोरंगाबारी , गोहपूर , दारंग जिल्हा ( आता सोनितपूर जिल्हा ) आसाम येथे झाला . कनकलाताचे वडील सामान्य शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते होते. कनकलतास लहानपणी बिरबाला कंका असेही म्हणत. तिच्या गडद रंगामुळे तिला काली असे टोपणनाव ही देण्यात आले होते. तीचे पूर्वज अहोम राजांच्या दरबारात मंत्री होते, असेही म्हणतात. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तिची आई अर्थात कर्णेश्वरी बरुआ यांचे निधन झाले. काही वर्षांनी तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं पण कनकलता तेरा वर्षांच्या असताना वडिलांचाही मृत्यू झाला. आतापर्यंत कनकलता स्थानिक शाळेत शिक्षण घेत होती पण नंतर तिच्या लहान बहिणी रजनीकांता बरुआ आणि दिव्यलता बरुआ यांची काळजी घेण्यासाठी आणि घरातील कामे करण्यासाठी तिने शिक्षण सोडले. कनकलता बरुआ लहानपणापासूनच तिच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा वेलक होती. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा ! आपल्या आसपास होणारे आंदोलन, चळवळ, क्रांती, लढा, बलिदान पाहून तिच्याची मनात स्वातंत्र्याची ज्वाला जळू लागली होती. ती देशभक्तीपर विचारांनी ओतप्रोत भरली होती तसेच जुलमी ब्रिटिशांविरुद्ध तिच्या मनात प्रचंड चीड होती.
दरम्यान, ज्योती प्रसाद अग्रवाल व आसामी स्वातंत्र्यसैनिकांनी तेजपूर येथे मृत्यु वाहिनी नावाचा एक गट स्थापन करून या प्रदेशात चळवळीला आकार दिला. कनकलता बरुआ मृत्यु वाहिनीमध्ये गोहपूर उपविभागाच्या ‘भारत छोडो’ आंदोलनात सामील झाल्या. 20 सप्टेंबर 1942 रोजी मृत्यु वाहिनीने गोहपूर पोलीस स्टेशनवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला. कनकलता बरुआ यांच्या नेतृत्वाखाली निशस्त्र ग्रामस्थांच्या मिरवणुकीने पोलिस ठाण्याकडे आपला मोर्चा वळवला. कनकलता यांनी झेंडा उंच धरून ‘करो किंवा मरो’ च्या घोषणा दिल्या. यापुढे मिरवणूक काढल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पोलिसांनी दिला तरीही अतिशय निधड्या छातीने व तितक्याच निश्चयाने मिरवणूक पुढे जात राहिली. तेव्हाच किशोर कनकलाराने मोठ्याने म्हणाले “तुम्ही आमच्या मानवी शरीरांना मारू शकता पण आमच्या लोखंडापासून बनवलेल्या आत्म्याला नाही. अरे ब्रिटिशांनो! आम्हाला रोखण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते अयशस्वी होईल. आम्ही पुढे जात राहू. पोलीस चौकीवर आमचा राष्ट्रध्वज फडकवण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही.” मिरवणुकीत आपल्या दोन्ही हातात राष्ट्रध्वज घेऊन अवघ्या १७ वर्षांची कनकलता अग्रभागी चालत होती. ब्रिटीश अधिकार्यांनी राष्ट्रध्वज उंच ठेवलेल्या कनकलता बरुआ व सर्व मृत्यू वाहिनीच्या सदस्यांवर बंदुका रोखल्या. पण, “करो वा मरो” निव्वळ हाच ध्यास मनी घेऊन स्वातंत्र्ययुद्धात उतरलेल्या नौजवान तरुण-तरुणींना मृत्यूची काय पर्वा ! कनकलाता सोबत सर्वच सदस्य निर्धास्तपणे चालत राहिले. अखेर ब्रिटिशांनी कनकलता वर गोळीबार केला आणि अवघ्या १७ वर्षांची ही कोवळी स्वातंत्र्यसेनानी धारातीर्थी पडली. आपली कनकलता मृत्युमुखी पडली, हे डोळ्यासमोर असतानाही गटातील इतर शूर स्वातंत्र्यसैनिकांनी राष्ट्रध्वज खाली पडू दिला नाही. मुकुंदा काकोटी यांनी ध्वज हातात धरला, परंतु त्यांच्यावरही गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. एकापाठोपाठ एक आणखी असे अनेक शूर सुपुत्र ध्वजाच्या सन्मानासाठी सामील झाले, कित्येक गोळीबारात जखमी झाले वा मृत्यूमुखी पडले. अखेर रामपती राजखोवा यांनी गोहपूर पोलीस चौकीवर अखेर तिरंगा फडकवला!
हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. पण भविष्यातील पिढी सुखात रहावी, यासाठी कसलीही पर्वा न करता बलिदान देणं, हे केवळ भरतीयांनाच जमलं आहे. मग ते शिरीष कुमार असो, खुदिराम बोस असो किंवा कनकलता बरुआ! स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्वांनाच आमचा सलाम !