You are currently viewing जालियनवाला बाग हत्याकांड

जालियनवाला बाग हत्याकांड

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास,

नयन झाकले असशिल देवा तूं अपुले खास!

कुसुमाग्रज

१३ एप्रिल १९१९….

जालियनवालाची जखम ही अश्वत्थामाच्या जखमेसारखी आहे, ती कधीही भरून नाही. त्यात आमचं कोणीही रक्ताचं नव्हतं, पण तरीही आजपर्यंत ही घटना फार जिव्हाळ्याची वाटते. ही घटना का घडली? या घटनेची पार्श्वभूमी काय ? स्वातंत्र्यलढ्यात ही घटना महत्त्वाची का? याच घटनेचा बदला सरदार उधम सिंह यांनी का घेतला? या सर्वांची उत्तरं आमच्या या नवीन लेखाद्वारे आम्ही सर्वांसमोर मांडत आहोत.

इ.स १९१९ च्या भारतात सशस्त्र क्रांतीचे वारे अधिक वेगानं वाहू लागले होते ह्यालाच आळा बसवण्यासाठी ब्रिटिश सरकारने “रौलट अ‍ॅक्ट” नावाचा कायदा पारित केला. या कायद्यानुसार “देशभरातील कोणावरही ब्रिटिश सरकारशी द्रोह केल्याचा निव्वळ संशयमात्र जरी ब्रिटिशांना आला तरी संबंधित व्यक्तीला विनापरवाना अटक करण्याची सूट इंग्रजांना मिळाली”. महात्मा गांधींनी ह्या रौलट अ‍ॅक्टला “काला कानून” असं संबोधले अन संपूर्ण भारतभरातून ब्रिटिशांच्या ह्या जाचक कायद्याचा निषेध होऊ लागला. गांधींच्या सत्याग्रहाचा पहिला देशव्यापी प्रयोग रौलट कायद्याविरोधातच झाला होता आणि याचा प्रभाव अमृतसरमध्येही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. यावेळीच डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या क्रांतिकारक व स्थानिक नेत्यांना अटक झाल्यामुळे अमृतसर शहरात सर्वत्र अस्वस्थता पसरली. या कारवाईचा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने निघालेल्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला त्यात ३० लोकं मारले गेले. याच कारणाने अमृतसरमध्ये दंगल आणि जाळपोळ करण्यात आली परिणामी मार्शल लॉ म्हणजेच आजचा सेक्शन १४४ लागू करण्यात आला. याशिवाय ब्रिटिशांच्या अत्याचारी वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी व बैसाखी या सणाचे औचित्य साधून एक सभा भरवली गेली होती.

अगदी याच काळात अमृतरसर मधील “चर्च ऑफ इंग्लंड” ची गोरी प्रतिनिधी “मिसेस शेरवूड” हिला काही भारतीयांनी बेदम मारहाण केली. सदर घटनेबद्दल मिसेस शेरवूड ह्यांनी रीतसर तक्रार नोंदवली. ही बातमी जेव्हा ब्रिटिश सरकारला समजली तेव्हा ब्रिटिश सरकारी अधिकारी “मायकेल ओड्वायर” ने लगेच जमावबंदीचा आदेश लागू केला अन ह्या आदेशाविरुद्ध होणारी सर्व निदर्शने मोडून काढण्यासाठी ओड्वायरने “जनरल डायर” ची नियुक्ती केली व त्याला “शूट अ‍ॅट साईट” ची तत्काळ आज्ञा दिली.

अमृतरसर मध्ये जमावबंदी आदेश काटेकोरपणे लागू करण्यात आला, पण १३ एप्रिलला शिखांचा पवित्र असा सण “बैसाखीं” येणार होता. बैसाखी सणाचे औचित्य साधून अमृतसरमधील “जालियनवाला बाग” इथे ब्रिटिश सरकारचा निषेध करणारी शांतीपूर्ण सभा भरवण्यात आली होती. अगदी 5-10 वर्षांच्या लहान-सहान मुलापासून ते तरुण-वृद्ध स्त्री-पुरुषांपर्यंत अगदी सर्वांनी सभेला उपस्थिती दर्शवली होती. सभेला जवळपास २० हजार एवढी गर्दी जमली होती. सभा सुरू झाली एक वेगळेच चैतन्य चहूबाजूंला पसरले होते.

जनरल डायर

पण तेवढ्यात घात झाला__
जनरल डायर अन त्याचे जवळपास ५० सैनिक जालियनवाला बागेच्या एकुलत्या एक प्रवेशद्वारासमोर आपल्या बंदुका भारतीयांवर राखून तयार होते. दुर्दैव म्हणजे सर्वच सैनिक भारतीय होते. ९ गुरखा रायफल्स, ५४ सिख रेजिमेंट आणि ५९ सिंध रायफल्सचे सैनिक होते. आपापली फायरिंग पोजिशन त्यांनी घेतली होती. जमावाला कसलेही अखेरची चेतावणीसुद्धा देण्यात आली नव्हती. अन तेवढ्यात डायर ने “फायर” चा आदेश दिला,

धाड्-धाड्-धाड् गोळ्या सुटू लागल्या___

वातावरणात एकच हलकल्लोळ माजला. बाल-तरुण-वयोवृद्ध अशा कित्येकांच्या निरपराध किंकाळ्यांनी अवघा आसमंत हादरला. सर्वत्र धावपळ सुरू झाली. गोळ्या कशाही आणि कुठेही लागत होत्या. काहीजण गोळ्या लागून ठार झाले तर कित्येकजण गंभीर जखमी झाले. जालियनवाला बागची माती रक्ताने माखली होती. मृतदेहांचा खच पडला होता. अचानक उठलेल्या धावपळीत खाली पडल्यावर इतरांच्या पायाखाली चिरडून सुद्धा बरेच लोक मेले, काहींनी प्राण वाचवण्यासाठी बागेतील विहिरीत उड्या घेतल्या पण विहिरीत ही बरेचजण गतप्राण झाले. विहिरतूनच १२० प्रेतं बाहेर काढली असं म्हणतात.

जीवाच्या आकांताने अनेक निष्पाप नागरिकांनी याच विहिरीत उडी घेतली

काही वेळाने जनरल डायरचा हा निर्घृण गोळीबार संपला, पण का ??
त्याला भारतीयांची दया आली म्हणून ?
तर अजिबात नाही, डायरने आणलेल्या गोळ्या संपल्या होत्या त्यामुळे तो थांबला होता. यावेळी एकूण १६५० राऊंड फायर करण्यात आले होते.

जालियवाला बागेतील भिंतींवर असणारे गोळ्यांचे निशाण दाखवताना स्थानिक
जालियवाला बागेतील भिंतींवर असणारे गोळ्यांचे निशाण

गोळीबारानंतर जनरल डायर ने सभेच्या ठिकाणी “भारतीयांची अब्रू काढणारं छोटंसं भाषण केलं”. या गोळीबारात जवळपास १००० पेक्षा अधिक भारतीय प्राणास मुकले त्यात शंभराहून अधिक लहान मुले होती. दोन-तीन हजार लोक जखमी झाले होते. गोळ्या संपल्यामुळे नाईलाजाने डायर थांबला पण त्याचे अत्याचार अजूनही थांबणारे नव्हते. जे लोक जिवंत राहिले होते अशा सर्वांना शिक्षा देण्याचा एक नवीन उपाय त्याने अंमलात आणला.

जे लोक जिवंत असतील व त्यांना बागेतून जिवंत बाहेर पडायचे असेल त्या सर्वांनी बागेपासून ते मिसेस शेरवूड ला मारहाण झाली त्या स्थाळापर्यंत सरपटत जायचे. यात कोणी चुकारपणा केला तर फटके बसतील

असा आदेश डायरने दिला__

अन हजारो जिवंत वा जखमी अवस्थेतील भारतीय सरपटत सरपटत पुढे जाऊ लागले.

जालियवाला बागेतील भिंतींवर असणारे गोळ्यांचे निशाण

१३ एप्रिलच्या रात्री आपल्या पतीला शोधण्यासाठी रतनी देवी जालियनवाला बागेत गेल्या होत्या. बागेत चहुबाजूंना शहीदांचे असंख्य मृतदेह, शरीराचे तुकडे विखुरले होते. सदर प्रसंगाचं त्यांनी केलेलं वर्णन __

“मी बागेत नातेवाईकांना शोधत असलेले लोक पाहिले. मी संपूर्ण रात्र तिथे घालवली. मला जे वाटले ते वर्णन करणे माझ्यासाठी अशक्य आहे. इकडे तिकडे मृतदेहांचे ढीग पडलेले होते, काही पाठीवर पडलेले होते. अनेक मृतदेह निष्पाप मुलांचेही होते. ते भयानक दृश्य ती कधीच विसरू शकत नाही. रात्रभर मी त्या निर्जन जंगलात एकटाच होती. कुत्र्यांच्या भुंकण्याशिवाय आणि गाढवांच्या किंकाळ्याशिवाय कोणताही दुसरा आवाज ऐकू येत नव्हता. मी रात्रभर रडत आणि त्या मृतदेहांमध्ये पतीला शोधण्यात घालवली. बाकी काही सांगता येत नाही. त्या रात्री मी काय पाहिले, मला काय वाटले हे फक्त मला आणि माझ्या देवालाच ठाऊक आहे.”

या हत्याकांडानंतर डायर ला ब्रिटीश सरकारने लंडनला पाठवले तेव्हा ओड्वायरने त्याच्यासाठी सार्वजनिक निधी गोळा केला. दुर्दैव म्हणजे हा निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेणारा आपणच डोक्यावर घेतलेला जंगल बुकचा लेखक रुडयार्ड किपलिंग होता. पुढे १-२ महिन्यात ओड्वायर ही निवृत्त झाला व लंडनला निघून गेला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे शाप डायरला भोवले. हत्याकांडाच्या दोनच वर्षांत त्याला पॅरालिसिस अर्थात अर्धांगवायूचा झटका आला व अखेर १९२६ ला वेदनेने तळमळत त्याचा मृत्यू झाला.

जालियनवाला बाग हत्याकांडात ब्रिटिशांचे अत्याचार क्रांतिकारक “सरदार उधमसिंह” ह्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते, जालियनवाला बागेत ते स्वतः १३ एप्रिल १९१९ रोजी उपस्थित होते, त्यांच्याही हाताला गोळी लागली होती. “जालियनवाला बाग” हत्याकांडाची आग एक नाही दोन नाही तब्बल २१ वर्ष आपल्या उरात तेवत ठेवत सरदार उधमसिंह यांनी 13 एप्रिल १९४० रोजी जनरल डायरला “शूट आउट” चा आदेश देणाऱ्या “मायकेल ओडवायर” अन त्यावेळीच्या भारतमंत्री “लॉर्ड झेंटलंड” दोघांना भर सभेत गोळ्या घालून ठार केलं.

हुतात्मा सरदार उधमसिंह

“जालियनवाला बाग” हत्याकांडाचा भारतीय सशस्त्र क्रांतिकरकांवर खूप खोलवर परिणाम झाला. चंद्रशेखर आजाद, भगतसिंह, राजगुरूसारख्या तरुण क्रांतिकारकांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध रोष उत्तरोत्तर वाढला.

जालियनवाला बाग हत्याकांडाची आग आपल्या मनात तेवत ठेवून ओडवायरचा वध करणाऱ्या “हुतात्मा सरदार उधमसिंह” यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

जालियनवालामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पपांनाही श्रद्धांजली !

जय हिंद !
जय भारत !

0
Please leave a feedback on thisx

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
संतोष हांडे
संतोष हांडे
2 years ago

जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटिश इतिहासाचे काळे पान.