You are currently viewing सावरकरांचा विज्ञानवाद – धर्म, धर्मग्रंथ आणि समाज

सावरकरांचा विज्ञानवाद – धर्म, धर्मग्रंथ आणि समाज

लेखाच्या सुरुवातीलाच वाचकांसाठी काही सूचना आहेत, त्या वाचूनच पुढील वाचण्यास सुरुवात करावी एवढीच अपेक्षा !

सूचना:-

  • आम्ही कोणत्याही धर्माचं, विचारसरणीचं आणि पक्षाचं प्रतिनिधित्व करत नाही. एकविसाव्या शतकास अनुरूप सावरकरांचा विज्ञानिष्ठ दृष्टिकोन, तत्कालीन जुनाट रूढी-परंपरा यांचं सावरकरांनी केलेलं खंडन आणि आधुनिक विचारसरणी जनमानसांत पोहचावी. हाच लेखमालेचा प्रामाणिक उद्देश आहे.
  • जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ण हे सर्व भेदाभेद बाजूला ठेवून, तटस्थ दृष्टीने हा लेख वाचाल तर सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आजच्या पोथी, प्रथा आणि परंपरांवर तुम्हाला पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडेल एवढं नक्की !
  • सदर लेख केवळ आणि केवळ सावरकरांच्या साहित्याचा आधार घेऊन आम्ही लिहला आहे. लेखातील सावरकरांच्या कोणत्याही वाक्याचा संदर्भ हवा असल्यास कॉमेंटबॉक्स अथवा ई-मेल द्वारे लेखकांशी संपर्क साधून आपण खुशाल संदर्भ मागू शकता. आपणास सर्व संदर्भ देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.
  • सदर लेख “सावरकरांचा विज्ञानवाद” या लेखमालेतील पहिले पुष्प आहे. पुढील काळात व्रते-वैकल्ये, जातीव्यवस्था, रूढी, परंपरा, यंत्रविज्ञान इ. विषयांवर सावरकरांचे विज्ञानिष्ठ विचार तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असेल.

आपल्या राष्ट्राला धार्मिक अज्ञानाच्या तमोगुणातून आजच्या पुढारलेल्या विज्ञानयुगात आणून सोडणे हे आपले अत्यंत पवित्र असे कर्तव्य आहे, हाच एक खरा धर्म आहे. [1]

स्वातंत्र्यवीर सावरकर

आज विनायक दामोदर सावरकर म्हंटल की राष्ट्रस्वातंत्र्यासाठी असिधरिचे व्रत घेतलेला, अंदमान मध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेला एक महान देशभक्त राजकारणी एवढी ढोबळ ओळख बनली आहे. जाती-धर्माचं राजकारण आणि वाद-विवाद भारतीय महापुरुषांच्या पाचवीला पुजलेला आहेच, स्वातंत्र्यवीर सावरकरही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळेच सावरकर आणि त्यांचे विचार हिंदू धर्म, हिंदुत्व किंवा हिंदुत्ववादी विचारसरणी एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. सावरकरांच्या वाङमयाचा अभ्यास केल्यावर तीक्ष्ण बुद्धिमत्ता, विज्ञाननिष्ठ आधुनिक दृष्टिकोन, टोकाचा बुद्धिप्रामाण्यवाद, मार्मिक लेखनशैली आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती आदि गुणांनी युक्त सावरकर म्हणजे एक बहु आयामी व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

आज नाहीतर उद्या भारताला स्वातंत्र्य मिळेलच, पण त्यानंतर समाजातील विषमता, दारिद्र्य, जुनाट विचारसरणी आणि अंधश्रद्धांचे माजलेले स्तोम या सर्वांवर सावरकरांनी सडकून टीका केली. विसाव्या शतकात बाहेरील जग आधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त महायुद्धाच्या धामधुमीत असतानाही, श्रुतीस्मृतीपुराणांच्या विळख्यात अडकलेल्या भारतीय समाजाला__ “महाभारतातील गांडीव धनुष्य भंगले! आता मशिनगन्सशी गाठ आहे!”[1] असा झणझणीत फटकारा लावणारे सावरकर.

१९३७ साली सावरकरांची रत्नागिरी येथून स्थनबद्धतेतून मुक्तता झाली. त्यावेळी एक पत्रकार सावरकरांना म्हणाला “१९१० सालातील सावरकर आम्हाला मान्य आहेत. ज्यांनी हाती पिस्तुल घेतले आहे. ते सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक सावरकर आम्हाला मान्य आहेत.” याला प्रत्युत्तर म्हणून सावरकर लगेच म्हणाले__ “१९१० सालचा सावरकर कळायला तुम्हाला १९३७ साल उजाडावे लागले. आता १९३७ चा सावरकर कळायला तुम्हाला १९६७ साल उजाडावे लागेल. सावरकर नेहमी ३० वर्षे जगाच्या पुढे असतो.” [6] सावरकर म्हणाले ते खरच होत, रत्नागिरीमधील स्थनबद्धतेत सावरकरांनी मांडलेले विज्ञानिष्ठ विचार, तत्कालीन प्रथा, परंपरेवर केलेला आघात, जातीपाती निर्मूलनाच्या कार्यामुळे तत्कालीन सनातनी वर्ग चवताळला. आज जर पेशवाई असती तर, या सावरकराला त्यांनी हत्तीच्या पायी दिले असते अशा वल्गना हे लोक करू लागले. या साऱ्यांचा “भुक्कडांची मनोराज्ये भुक्कडच ! कुंभाराच्या मनोराज्यात गाढवेच गाढवे ! गाढवांच्या मनोरज्यात उकिरडेच उकिरडे !”[1] असा खरपूस समाचार घेणारे सावरकर, आज आम्हाला एकविसाव्या शतकातही कळले आहेत का ?

सावरकर कोणा हिंदुत्ववाद्याने किंवा ब्राह्मणाने आमच्या डोक्यात भरवून दिला नसून स्वतःच्या बुद्धीने अभ्यास करून आम्ही तो समजून घेतला आहे. [8]

शेषराव मोरे

दुर्दैवाने निव्वळ जातीने ब्राह्मण असल्याने कुणाला सावरकर पटले नाहीत,
पुरातन विचारसरणी नसानसांत भिनल्याने कुणाला सावरकर पचले नाहीत,
आणि हिंदुत्ववादी विचार मांडल्याने कोणी सावरकरांचा फक्त सोईस्कर वापर तेव्हढा केला. परिणामतः आजच्या एकविसाव्या शतकास अनुरूप सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार समाजापर्यंत पोहोचलेच नाहीत.
जात, पात, धर्म, अधर्म, रूढी, परंपरा सर्वांच्या पलीकडील विज्ञाननिष्ठ सावरकर सर्वांना कळण्यासाठीच हा सर्व प्रपंच.

धर्म, धर्मग्रंथ आणि समाज

आजपासून जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वी महान ग्रीक तत्वज्ञ अ‍ॅरीस्टोटल “मानव हा एक सामाजिक प्राणी आहे.” असं ने मांडलं. पण, समाज म्हणजे नक्की काय ? तर विशिष्ट भाषा, वर्ण, आचार, विचारांची शेकडो टाळकी एकोप्याने नांदू लागली की मग तयार होतो तो समाज. एखाद्याने बाल्यावस्थेत, तारुण्यात, प्रौढ झाल्यावर किंवा म्हातारपणात सुद्धा हे करावं आणि ते करू नये, असे सारे नियम समाजाद्वारेच ठरवून दिले जातात. थोडक्यात लहानग्या बाळापासून ते प्रौढांपर्यंत मानवाच्या प्रत्येक कृतीमागे विशिष्ट सामाजिक प्रवृत्ती दिसून येते. या सामाजिक प्रवृत्तीचा पाया असतो धर्म आणि धर्मग्रंथ !

“आम्ही जन्म घेतो तोच मुळी या श्रुतिस्मृतिपुराणोक्तात!”

स्वातंत्र्यवीर सावरकर

आजच्या घडीला धर्म शब्दाची व्याख्या कुठल्याही फॉर्म मध्ये असणाऱ्या “Religion(रीलीजन)” या रकाण्याइतकी उथळ झाली आहे. जगभरातील साऱ्या समाजांची पायाभरणी विशिष्ट धर्मग्रंथांच्या आधारे झालेली आहे. प्रत्येक धर्मात प्राचीन धर्मग्रंथ प्रमाण झाले असून, आज या धर्मग्रंथातील आचार, विचार मनुष्याची मूलभूत जीवनपद्धती बनले आहेत. धर्मग्रंथात सांगितलेल्या आज्ञा काटेकोरपणे पाळले म्हणजे झालं, “धार्मिक” किंवा “सनातनी” जीवन जगलो ! ही भावना उत्तरोत्तर वाढीस लागत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच शब्दांत “सर्वांनी, मनुष्याच्या ऊठण्याबसण्यापासून दाढी-मिशा शेंडीच्या लांबीरुंदीपासून, वारसांच्या, दत्तकांच्या, लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या साऱ्या विधानांवर ‘एष धर्मसनातनः’ हीच राजमुद्रा आणि तीही देवाच्या नावे ठोकली आहे !“ [2] अशा So Called धार्मिक वागण्याला सावरकर “श्रुतिस्मृतिपुराणोक्त प्रवृत्ती” हे चपखल विशेषण वापरतात.

सावरकर खऱ्या अर्थाने उच्चप्रतीचे तत्वज्ञ होते. “धर्मग्रंथावर समाजसंस्था उभे करण्याचे दिवस गेले ! विज्ञानयुगात समाजसंस्थेची पायाभरणी प्रत्यक्ष ऐहिक आणि वैज्ञानिक तत्वावर केली पाहिजे” [8] आपल्या या जहाल विचारांनी सावरकर नव्या पिढीला विज्ञानवादी बनण्यास उत्तेजीत करतात. ‘कोणतेही धर्मग्रंथ अपौरुषेय अथवा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहेत आणि म्हणूनच आचार, रूढी, निर्बंध मनुष्यामनुष्यातील ऐहिक व्यवहाराचे नियम परिस्थिती पालटेल तसे पालटित गेले पाहिजे. पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपरांच मन, बुद्धीची सारी कवाडं बंद करून निव्वळ आंधेपणाने अनुकरण करणाऱ्या समाजातील येणाऱ्या पिढीला “जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होय. असे सारे सनातन नियम आर्य, अनार्य, मुस्लिम, काफिर, स्त्री अथवा पुरुष यापैकी कुणासाठी आले नसून अखिल मानवजातीसाठी अवतीर्ण झाले असल्याने ते सर्वांना सारखेच आहेत” [1] असं सावरकर ठणकावून सांगतात.

पोथीजात ‘धर्म’ म्हटला की, बुद्धी कशी आंधळी होते, किंबहुना बुद्धीचे डोळे काढून घेण्यासाठीच कित्येक वेळा ‘धर्मा’चे सांडस तापवून हेतुतःच कसे घुसविले जातात.[2]

स्वातंत्र्यवीर सावरकर

प्राचिन काळी ऋषीमुनींनी जे ज्ञान सांगितल निव्वळ त्यालाच ब्रम्हज्ञान मानून आजही पुरातन धार्मिक नियमांनुसार आचरण करण्याऱ्या भारतीय समाजाचा सावरकरांना भयंकर राग आहे. “जे लोक धर्मग्रंथांची सत्ता आपल्यावर चालु देतात, ते श्रुतिस्मृतिपुराणोक्ताचे, त्या पुरातनाचे बंदे गुलाम होऊन बसतात[8] हे स्पष्ट मत सावरकर मांडतात. प्राचीन धर्मग्रंथात गुरफटलेल्या भारतीय समाजाची तुलना युरोपियन समाजाशी करताना सावरकर म्हणतात_“ते पूजक ‘आजचे’ आम्ही ‘कालचे’! ते नव्याचे, आम्ही जुन्याचे! ते ‘ताज्या’ चे भोक्ते, आम्ही ‘शिळ्या’ चे! एकंदरीत पाहाता त्यांची संस्कृती अद्ययावती, आमची पुरातनी !”.[1] आज भारतातील प्रमाण ग्रंथ म्हणजे आपले वेद आणि पुराणे, यामध्ये असणारं सार, ज्ञान आज आपण परम् सत्य मानतो. सावरकर अशा प्रवृत्तीला मूठमाती देतात, वेदांना पाच हजार वर्ष जून ग्राह्य धरल तर ते पाच हजार वर्ष मागासलेले आणि जग पाच हजार वर्ष पुढे गेलेले ! हे साधं गणित मांडून “मागासलेल्या धर्मग्रंथांस त्रिकालाबाधित मानल्यामुळे त्यांच्याइतके सदोदित मागासलेले राहणे असे भाग पडते !”[1] हा सिद्धांत सावरकर अधोरेखीत करतात.

युरोपियन राष्ट्रांनी आपापले धर्मग्रंथ बाजूला ठेऊन विज्ञानाची कास धरली याचा सावरकरांना सार्थ अभिमान वाटतो. “युरोपियनांना प्रबल करणारा एकच ग्रंथ कोणता? बायबल नव्हे! त्याच्या अगदी उलट आज त्यांनी बायबल मिटले नि त्यांचे डोळे उघडले !”.[8] बायबल किंवा अन्य धर्मग्रंथांना बाजूला सारल्यानेच युरोप आणि इतर देशांची आज भरभराट झाली अशी रोखठोक भूमिका सावरकर मांडतात. हे पटवून देण्यासाठी सावरकरांनी काही अतिशय मार्मिक आणि चपखल उदाहरणे दिलेली आहेत, ती खालीलप्रमाणे___

“पालखी नि बैलगाडी या वैदिक कालच्या वाहनानंतर गेल्या पाच हजार वर्षांत नवीन वाहन असे काही आम्हास अद्भविता आले नाही. विज्ञाननिष्ठ युरोपने तीन शतकांत आज तीनशे वाहनप्रकार अद्भवून सोडले. पण आमचे शंकराचार्य चार माणसांच्या खांद्यावरून अजून मिरवतातच आहेत !” [1]

“बोरूच्या लेखणीपलीकडे गेल्या पाच हजार वर्षांत आम्ही दुसरे लेखनसाधन कल्पू शकलो नाही. विज्ञानी संस्कृतीच्या अद्ययावत प्रवृत्तीच्या युरोपने मुद्रणकला उचलली, टंकलेखक (टाअपरायटर), अकटंक (मोनोटाआप), पंक्तिटंकक (लिनोटाऔप) भराभरा शोधून काढले. शिवाजी महाराजांच्या पूर्वी छापखाना हिंदुस्थानात पोर्तुगिजांनी आणला, पण आम्ही त्या बोरूच्या लेखणीने त्या सुट्या लांबोळ्या पानावरच आमच्या पोथ्या कालपरवापर्यंत लिहीत होतो ! तशा श्रुतिस्मृतिपुराणोक्त पद्धतीने जी लिहिली नाही ती पोथी कसली ?” [1]

आजच्या युगास पोषक, समाजास जे अधिकाधिक हितवाह, नवीन पिढीस जे अधिक उपयुक्त आहे तेच आपण स्विकारले पाहिजे, मग ते कोणत्याही धर्मग्रंथात असो वा नसो हीच सावरकरांची ठाम भूमिका आहे. “राष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत राष्ट्रधारणास जो श्लोक उपयुक्त वाटेल तो, मनूचा असो, प्रक्षिप्त असो, तो आम्ही आचरू; जेथे तो परवडणार नाही, तेथे राष्ट्रहितसाधक असे अद्ययावत् ज्ञानाच्या कसोटीस उतरणारे नवीन निर्बंध करू.” [8] परिवर्तनाच्या आधुनिक वाटेवर चालल्याने युरोपीय देशांची प्रगती झाली आणि भारतासाठी सुद्धा प्रगतीचा हाच राजमार्ग आहे हेच सावरकर पटवून देतात. “आपला देश आज ज्या युगात प्रवेशू लागला आहे, ते युग युरोपमध्ये दोनशे वर्षांपूर्वी चालू झाले. म्हणजे युरोपच्या दोनशे वर्षे आपण मागे पडलेलो आहोत. युरोपमध्ये आज १९३६ वा सन चालू आहे तर आमच्या इकडे प्रगतीचा १७३६ वा !” [1]

एकविसाव्या शतकाचा धर्म विज्ञानच असणार आहे, हे सावरकरांनी सत्तर-ऐशी वर्ष आधी सांगितले. आजच्या घडीला शस्त्रास्त्रनिर्मिती, अंतराळविज्ञान, आण्विकसंशोधन, माहिती तंत्रज्ञान इ. क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची जी घोडदौड चालू आहे ती पाहता सावरकर खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकातील विज्ञानयुगाचे द्रष्टे ठरले आहेत. भारताला सार्वभौम, समर्थ, संपन्न आणि जागतिक महासत्ता म्हणून उभे करायचे असेल, तर आपल्या समाजास सावरकरांच्याच मार्गाने चालावे लागेल. म्हणजे नक्की काय करावे लागेल ? तर,

प्राचीन श्रुतिस्मृतिपुराणादि शास्त्रे, ऐतिहासिक ग्रंथ म्हणून संग्रहालयात, सन्मानपूर्वक ठेवून आता विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे. त्या ग्रंथाचा काल काय झाले हे सांगण्याचा अधिकार; आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार; प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानाचा. श्रुतिस्मृतिपुराणादि सारे स्मृतिग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वाने सन्मानितो; पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून; अनुल्लंघ्य धर्मग्रंथ म्हणून नव्हे ! त्यांचे सारे ज्ञान नि अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि नंतर राष्ट्रधारणास, उद्धारणास, जे अवश्य वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत् बनणार, अप-टु-डेट बनणार ! [1]

चला तर__
सावरकरांच्या स्वप्नातील भारत उभा करू,
अप-टु-डेट बनु !

क्रमशः ….!

संदर्भग्रंथ:-
  1. विज्ञाननिष्ठ लेख :- स्वातंत्र्यवीर सावरकर
  2. क्ष-किरणें :- स्वातंत्र्यवीर सावरकर
  3. अंधश्रद्धा निर्मूलन कथा :- स्वातंत्र्यवीर सावरकर
  4. जात्युच्छेदक निबंध :- स्वातंत्र्यवीर सावरकर
  5. स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र :- शिवराम लक्ष्मण करंदीकर
  6. अनादी अनंत सावरकर
  7. विचरकलह :- शेषराव मोरे
  8. सावरकरांच्या समजक्रांतीचे अंतरंग :- शेषराव मोरे

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

0
Please leave a feedback on thisx

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Dnyanraj Vitthal Bhale
Dnyanraj Vitthal Bhale
1 year ago

खूप छान मांडलय 👍👌

Dnyanraj Vitthal Bhale
Dnyanraj Vitthal Bhale
1 year ago

खूप छान मांडणी केली आहे 👍👌