तेरे यलगार में तामीर थी तखरीब ना थी…
– मखमुर जालंधरी
तेरे ईसार में तर्गीब थी तादीब न थी…!

म्हणावं तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात शिवकाळातच झाली होती. ब्रिटिशांचं कपट सर्वप्रथम कोणी ओळखले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनीच ! मराठा साम्राज्याचे पतन झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला भारतावर राज्य करण्याची आयती संधी मिळाली. अनेक क्रांतिवीर ब्रिटिशांशी दोन हात करण्यासाठी पुढे आले. १८५७ चा बलाढ्य उठावदेखील झाला. मात्र या उठावाच्या ७५ वर्षांपूर्वीच ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या पराक्रमाने हादरवणारी एक महायोद्धा दक्षिण भारतात जन्मली होती. इंग्रजांविरुद्ध लढा देणारी पहिली महिला म्हणून नेहमी राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे पाहिले जाते, मात्र त्यांच्यापुर्वी तमिळनाडूतील शिवगंगईची राणी वेलू नाचियार यांनी ब्रिटिशांशी झुंज दिली होती. राणी वेलूने गाजवलेला पराक्रम सर्वश्रुत आहे, मात्र त्यांच्याच सैन्याची एक साहसी कमांडर इतिहासात लुप्त झाली. त्यांच्या कथेला इतिहासाने कधीही न्याय दिला नाही. भारताच्या इतिहासात सर्वात पहिला मानवी बॉंब (Human Bomb) बनून ब्रिटिशांना उखडून टाकणाऱ्या या बलिदानी विरांगनेचं नाव होतं ‘कमांडर कुईली’ !
कुईलीचं बालपण
कुईलीच्या वडिलांचे नाव पेरियामुथुन आणि आईचे नाव राकू होते. त्यांचे कुटुंब तमिळनाडूच्या अरुणथथियर येथे वास्तव्यास होते. तिची आई फार बहादूर होती. एकदा आपल्या शेताचे रक्षण करत असताना एका जंगली प्राण्यासोबत लढताना त्यांचा मृत्यू झाला. आईच्या निधनानंतर कुईलीचे वडील तिच्या आईच्या बहादुरीच्या अनेक कथा तिला दर रात्री सांगे. त्या पराक्रमी मातेचा प्रचंड प्रभाव लहान कुईलीवर पडला होता. आपण आपल्या आईसारखेच बनायचे, असा निश्चय तिने बालपणीच केला होता.
त्याकाळी शिवगंगई राज्याची परिस्थिती फार बिकट होती. शिवगंगईचे राजा पेरिया थेवर यांच्यावर साम्राज्य सोडून जाण्यासाठी कर्नाटकच्या नवाबाने दबाव टाकला होता. अखेर एक दिवस इंग्रजांच्या साथीने नवाबाने राजावर हल्ला केला. यामध्ये राजा पेरिया यांच्या मृत्यू झाला आणि संपूर्ण प्रदेश इंग्रज आणि नवाबांच्या नियंत्रणाखाली आला.
राणी वेलू नाचियारचा संघर्ष आणि कमांडर कुईली
आता आपल्या राज्याला मुक्त करण्याची जबाबदारी राणी वेलू नाचियार यांच्यावर आली होती. आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राणी भूमिगत झाली होती मात्र आपल्या गुप्तचर विभागाच्या माध्यमातून ती राज्यात सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेऊन होती. कुईलीचे वडीलदेखील राणीच्या गुप्तचर विभागात कार्यरत होते. कुईली सतत आपल्या वडीलांसह असे आणि याचवेळी राणीचा सहवासदेखील तिला लाभला. तिचे साहस पाहून राणी फार प्रभावित झाल्या आणि त्यांनी कुईलीला आपल्या सैन्यात घेतले. काही दिवसांनी नवाब आणि इंग्रजांना राणीच्या संपूर्ण रणनीतीची माहिती मिळाली आणि त्यांनी राणीला ठार करण्याचे षडयंत्र रचले. एक दिवस राणीवर आत्मघाती हल्ला करण्यात आला. पण कुईलीने प्रसंगावधानाने राणीचा बचाव केला आणि हल्लेखोराला ठार केले. यामध्ये ती किरकोळ जखमी झाली. मात्र राणी तिच्या शौर्याने भारावून गेलली आणि तिला आपले अंगरक्षक बनवून घेतले.
आपण पाठवलेला हल्लेखोर एका कुईली नावाच्या शिपाईने ठार केला अशी माहिती ब्रिटिशांना आणि नवाबांना मिळाली. त्यांनी योजना आखून कुईलीला पकडले आणि राणीची माहिती मिळवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागले. धीट असलेल्या कुईलीने राणीची माहिती देण्यास नकार दिला आणि ब्रिटिशांनी तिच्यावर प्रचंड अत्याचार सुरू केला. याशिवाय तिच्या समाजाला लक्ष्य करून लोकांची कत्तल सुरू केली. कुईली अस्वस्थ झाली. एके रात्री कशीबशी ती ब्रिटिश सैनिकांच्या तावडीतून सुटली आणि राणीकडे पोहोचली. तिने राणीला सगळी हकीगत सांगितली. हे सगळं ऐकल्यावर राणीने कसलाही विचार न करता तातडीने दोन निर्णय घेतले ते म्हणजे थेट ब्रिटिशांवर हल्ला करण्याचा आणि कुईलीला आपल्या महिला तुकडीचा कमांडर बनवण्याचा !
कुईलीचं आत्मबलिदान

राणीला हे ज्ञात होतं की आपण एकट्याच्या बळावर ब्रिटिशांचा सामना करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी हैदर अली आणि गोपाल नायाकेर यांच्याकडे मदत मागितली. दोघांनीही राणीला मदत करण्यासाठी होकार दिला आणि युद्धाला सुरुवात झाली. ब्रिटिशांकडे सुसज्ज असा शस्त्रसाठा होता, त्यासमोर आपल्या सैनिकांचा निभाव लागणे कठीण होते, हे राणीला कळले. ब्रिटिशांच्या तोफांच्या माऱ्यासमोर अनेक सैनिक ठार झाले होते. यावेळी कुईलीने ब्रिटिशांचा संपूर्ण शस्त्रसाठाच नष्ट करण्याची योजना केली आणि या योजनेमुळेच ती इतिहासात अजरामर झाली. ब्रिटिश सैनिकांनी आपला सर्वाधिक शस्त्रसाठा शिवगंगई किल्ल्याच्या आत ठेवला होता. किल्ल्याच्या आत एक राजराजेश्वरी मंदिर होते. नवरात्रीच्या काळात या मंदिरात महिलांना जाण्याची परवानगी मिळत असे आणि सुदैवाने तेव्हा नवरात्रीचा सण सुरू होता. कुईलीने तिच्या काही साथीदारांसह साधारण वस्त्र परिधान करून किल्ल्याच्या आत प्रवेश केला आणि वाटेत येतील त्या सैनिकांचा वध करून दारुगोळा शोधण्यास सुरुवात केली.
अखेर एका ठिकाणी ब्रिटिशांनी ठेवलेला संपूर्ण शस्त्रसाठा त्यांना सापडला. मात्र हा साठा एकाच वेळी नष्ट करण्यसाठी कुईलीने जो निर्णय घेतला, तो इतिहासातील सर्वश्रेष्ठ बलिदान म्हणून गणला गेला.
तिने आपल्या सर्व साथीदारांना मंदिरातले तेलाने भरलेले दिवे घेऊन येण्यास सांगितले आणि संपूर्ण तेल कुईलीने आपल्या अंगावर ओतून घेतले. तिने आपल्या सर्व साथीदारांना शस्त्रसाठ्यापासून दूर जाण्यास सांगितले आणि क्षणातच स्वतःला पेटवून दिले. तिथे भडकलेल्या अग्नीमुळे सर्व शस्त्रांनी पेट घेतला आणि एक भयंकर मोठा विस्फोट झाला. केवळ या धमाक्यामुळेच ब्रिटिश सैनिक रणांगण सोडून पळून गेले. राणी वेलू नाचियारचा मोठा विजय झाला. पण या विजयासाठी कुईलीसारख्या महान वीरांगनेने या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. कुईलीच्या जागी एखादा पुरुष असता, तरी तो असे साहस करू शकला नसता. २१व्या शतकातील ओशो नावाचा एक मोठा तत्वज्ञानी होऊन गेला, त्याचं एक वाक्य आहे, ‘स्त्री इस दुनिया की सबसे बडी ताकत है, इतनी बडी ताकत की एक मर्द पैदा कर सकती है’! अमर बलिदानी कुईलीच्या बाबतीत हे वाक्य खरं ठरतं.
भारताच्या इतिहासाने अशा अनेक वीरांगना आणि महान महिला योद्धांना न्याय द्यायला हवा. त्यांच्या अमर गाथांचा शालेय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समावेश करायला हवा. आजच्या आधुनिक युगात अशा महान स्त्रिया सर्वांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण स्वतः त्यांच्या कथा युवा वर्ग आणि शालेय विद्यार्थ्यांना सांगायला हव्यात. आपले आत्म बलिदान देऊन कुईलीने त्यागाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण देशासमोर ठेवले आहे. हे बलिदान इतिहास जरी विसरला असेल तरी आमच्यासारखे इतिहास वेडे कधीही विसरणार नाही.
संदर्भसूची :-
१. Saffron Swords: Centuries of Indic Resistance to Invaders – Manoshi Sinha Rawal