भारतात स्वातंत्र्य लढ्यासह सामाजिक आणि विशेषतः राजकीय, औद्योगिक व सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे अनेक व्यक्तिमत्त्व झाले आहेत. तळागाळातील नागरिकांचा विकास व्हावा आणि त्यांच्यापर्यंत उपजिविकेची प्रत्येक गोष्ट पोहोचावी, यासाठी अनेक लोकं झटले आहेत. आपल्या या उपक्रमाच्या पहिल्या लेखात आपण दुर्गाबाई देशमुख यांच्या रूपात समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारी महान महिला पाहिली. त्यांच्याच काळात जन्माला आलेल्या आणखी एक अशाच थोर महिला व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत, ज्यांचं नाव आहे कमलादेवी चट्टोपाध्याय ! भारताची ‘कल्चर क्वीन’ असं बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या कमलादेवींना आज साहजिकच फार लोकं ओळखत नसतील, मात्र भारतात जन्मणाऱ्या भविष्यातील कित्येक पिढ्यांचं पोट भरू शकतं, इतकं महान कार्य त्यांनी केलं आहे, त्यांचं हेच योगदान या लेखाद्वारे जाणून घेऊ !

कमलादेवींचा जन्म मंगळूरचा ! ३ एप्रिल १९०३ रोजी अनंथय्या आणि गिरीजाबाई यांच्यापोटी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबातील सर्वच उच्च शिक्षित, त्यामुळे शिक्षणात कोणतीही कमतरता त्यांना भासली नाही. महादेव रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, रमाबाई रानडे, अँनी बेजंट या स्वातंत्र्यलढ्यात प्रतिष्ठित समाजसेवकांशी त्यांच्या वडिलांची मैत्री होती. मात्र बालवयातच त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळत गेले. वयाच्या ७व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर काही काळाने त्यांच्या अगदीच जवळ असलेली त्यांची धाकटी बहीण सगुनाचे निधन झालं. बालविवाहाच्या प्रथेने त्यांचीही पाठ सोडली नव्हती. वय अवघे १४ वर्ष असताना त्यांचं लग्न झालं आणि पुढील २ वर्षातच त्या बालविधवा झाल्या. इतके धक्के लागले असतानाही त्या डगमगल्या नाहीत. आपल्या पूर्वजांचा लढाऊ बाणा कायम ठेवला. आईची साथ असताना शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं.
स्वातंत्र्य लढ्यातील योगदान
क्वीन मेरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांचे हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्यावर प्रेम जडले आणि दोघांनी लग्न केले. आयुष्य बदललं होतं, मात्र आपल्या कुटुंबीयांची शिकवण आणि संस्कार त्या विसरल्या नव्हत्या. देशाभिमान, राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती. कॉलेजच्या दिवसातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळींमध्ये सहभाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्य लढ्याला महान महिला योद्धांचेही योगदान लाभले आहे, याचा दाखला देत महिलांना सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी महात्मा गांधीजींची मनधरणी केली. गांधीजींच्या असहकार चळवळ आणि मिठाच्या सत्याग्रहात कमलादेवी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि विशेष म्हणजे या सत्याग्रहादरम्यान अटक झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. महिलांना स्वातंत्र्य लढ्यासह विविध क्षेत्रांमध्ये प्राधान्य मिळावं, यासाठी त्यांनी ‘ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स’ची स्थापना केली. महिलांचे मूलभूत अधिकार आणि आर्थिक, धार्मिक, सामाजिक स्वातंत्र्य या विषयांचाही त्यांनी भरपूर पाठपुरावा केला. स्वातंत्र्य लढ्यातील आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचं अस्तित्व एखाद्या झंझावातासारखं होतं. त्याकाळी भारतात निवडणूकांमध्येही पुरुषप्रधान प्रवृत्ती घोळली होती. मात्र महिलांसाठी लढण्याचा वसा घेतलेल्या कमलादेवी चक्क सार्वजनिक निवडणुकीला उमेदवार म्हणून सामोऱ्या गेल्या. या निवडणुकीत कमी मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला मात्र त्यांनी महिलांच्या राजकीय प्रवासाचा मार्ग सुकर केला. विशेष म्हणजे निवडणूक लढणाऱ्या कमलादेवी भारताच्या पहिल्या महिला होत्या.

‘हथकरघा मां’
स्वातंत्र्यसंग्राम आणि महिलांच्या हिताच्या लढ्यात आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवल्यामुळे समाजात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले. स्वातंत्र्य लढ्यासह कला क्षेत्रातही त्यांनी अतुलनीय योगदान दिलं. आपल्या भारतीय कलेचा वारसा जपत हातमागाचं संवर्धन आणि जतनासाठी त्यांनी भरपूर काम केलं. याच कामामुळे त्यांना ‘हथकरघा मां’ अशी उपाधी मिळाली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हस्तकला आणि शिल्पकला या लोप पावत चाललेल्या कलांना पुन्हा उभारी देण्यासाठी पुढाकार घेतला. भारताच्या विविध प्रातांमध्ये असलेल्या विविध कला त्यांनी शोधून काढल्या आणि कलेला वाव मिळावा यासाठी स्थानिक नागरिकांनाही प्रोत्साहित केले. गाव-खेड्यांमध्ये जाऊन त्यांनी नानाविध हस्तकला, शिल्पकला, हातमाग आणि इतर कलांच्या नोंदी करून ठेवल्या. भारतातील विणकर समाजाला त्यांनी पुन्हा नवीन ओळख मिळवून दिली होती. त्यांचा आदर इतका वाढला होता की, त्या कुठेही गेल्या तरी कारागीर त्यांना आईचं स्थान देऊन त्यांच्या पायावर पगडी ठेवत. देशाच्या कानाकोपऱ्यातील लपलेली कला त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली. याच कारणाने १९५२ साली ‘ऑल इंडिया हँडीक्राफ्ट्स’च्या प्रमुखपदी त्यांना नियुक्त करण्यात आले. त्यांच्याच प्रयत्नांनी भारतात ‘क्राफ्ट काउंसिल ऑफ इंडिया’ सारख्या संस्था उदयास आल्या.

साहित्य आणि कलेच्या धनी
लिखाणाची प्रचंड आवड असलेल्या कमलादेवींनी आंतरराष्ट्रीय संबंधांवर अनेक पुस्तकेदेखील लिहिली होती. ‘द अवेकिंग ऑफ इंडियन वूमन’, ‘जापान – इट्स वीकनेस अँड स्ट्रेंग्थ’, ‘अंकल सॅम एम्पायर’, ‘इन वॉर टॉर्न चायना’, ‘टुवर्डस् ए नॅशनल थिएटर’ अशी त्यांची अनेक पुस्तके गाजली. तसेच भारतीय हस्तकलेवर त्यांनी ‘हॅन्डीक्राफ्ट ऑफ इंडिया’, ‘इंडियन क्राफ्ट्स ट्रेडीशन, ‘द ग्लोरी ऑफ इंडियन हॅन्डीक्राफ्ट्स’ अशी अनेक पुस्तके लिहिली. आणखी एक सर्वात जास्त खास गोष्ट म्हणजे त्यांनी अभिनेत्री म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुरुवातीला ‘मृच्छाकटिका’ आणि ‘तानसेन’ या दोन मूकपटांमध्ये त्यांनी नायिका म्हणून काम केले होते, यानंतर ‘शंकर पार्वती’ आणि ‘धन्ना भगतट’ या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या होत्या. ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’ आणि ‘संगीत नाटक अकादमी’च्या उभारणीतही त्यांचं विशेष योगदान लाभलं. आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. गरीब आणि कल्पक बुद्धीच्या नागरिकांसाठी त्या ‘मसिहा’च ठरल्या होत्या. युनेस्कोच्या सदस्य असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही समाजकार्य करत आपल्या कार्याची छाप पाडली. एक अशी महिला जी निसर्गप्रेमी, स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक, नारीवादी, अभिनेत्री, लेखिका, उद्योजिका, राजकीय नेता इतके व्यक्तिमत्त्व हाताळणारी होती, तरीही तिचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये हरवले. २९ ऑक्टोबर १९८८ रोजी वयाच्या ८५व्या वर्षी या महानायिकेचे मुंबईत निधन झाले. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ज्यांनी महिला सशक्तीकरणासाठी पुढाकार घेतला, ज्यांनी हस्तकलेचा वारसा जपला, त्याच कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे नाव आजच्या पिढीला ज्ञात नाही, हे दुर्दैव! पण त्यांचं कार्य-कर्तृत्व आम्ही आमच्या लेखणीद्वारे सदैव जिवंत ठेवू, एवढंच !
कमलादेवींना नमन !
कामलादेवी यांना मिळालेले पुरस्कार
- पद्मभूषण
- रॅमन मॅगसेसे पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी ‘लाइफटाइम अचीव्हमेंट’ पुरस्कार
- युनेस्कोकडून गौरव
- पद्मविभूषण
- शांतिनिकेतनद्वारे ‘देसिकोट्टम’ पुरस्कार
- भारत सरकारकडून त्यांच्या नावाने कमलादेवी चट्टोपाध्याय एनआयएफ बुक प्राईज जाहीर
- २०१८ साली गुगलकडून डुडलद्वारे मानवंदना