You are currently viewing सरस्वती सुपरक्लस्टर (महादीर्घिका समूह)

सरस्वती सुपरक्लस्टर (महादीर्घिका समूह)

मुझ को शौक़-ए-जुस्तुजू-ए-काएनात…
ख़ाक से ‘आदिल’ ख़ला तक ले गया…!

आदिल नावाच्या शायरने लिहिलेल्या या शेरच्या शेवटच्या ओळी मनुष्य कशाप्रकारे पृथ्वीवरच्या शून्यातून ब्रह्मांडाच्या अनंताकडे पोहोचला हे दर्शवतात. मनुष्य या पृथ्वीवर का जन्मला, याचं उत्तर आजही शोधण्याचे तो कष्ट घेत नाही. मात्र कित्येक वैज्ञानिकांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी मनुष्याच्या रूपातील प्रत्येक गोष्टीबाबत कुतूहल असणाऱ्या आणि त्याचा शोध घेणाऱ्या या भटक्याला ओळखलं आहे. गॅलीलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावेपर्यंत अनेक ग्रहांपासून आपण अनभिज्ञ होतो. मुळातच त्यांनी आकाशाची सफर करण्यासाठी नाही तर पाण्यातले जहाज पाहण्यासाठी दुर्बीण बनवली होती, मात्र जेव्हा त्यांनी ती दुर्बीण आकाशाकडे फिरवली, तेव्हा या पृथ्वीवरील सर्वात मोठा चमत्कार घडला आणि ब्रह्मांडातील अनेक रहस्य आणि अंतराळातील आपले सवंगडी सापडण्यास सुरुवात झाली. आपण केवळ ग्रहांपुरते सीमित राहिलो नाही, तर निहारिका (Nebula), आकाशगंगा किंवा दीर्घिका, क्वेसार्सपर्यंत कोट्यवधी किमी दूर दूर पर्यंत आपली नजर पोहोचली. कित्येक वर्षांच्या शोधमोहिमेनंतर अनेक रहस्य उलगडले. नुकत्याच ४ वर्षांपूर्वी अशाच एका बलाढ्य गोष्टीचा शोध भारतीय वैज्ञानिकांनी लावला होता, त्याचीच माहिती सर्वांसमोर मांडत आहे.

सरस्वती

२०१७ साली पुण्यातील इंटर-युन्हीव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनिमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या टीमने एक अशी गोष्ट शोधून काढली, जी आजवर ज्ञात असलेली ब्रह्मांडातील सर्वात मोठी गोष्ट होती. तब्बल ४ अब्ज प्रकाश वर्ष दूर मीन (Pisces) तारकासमूहामध्ये ही अचंबित करणारी गोष्ट दडून बसली होती. या गोष्टीचा व्यासच जवळपास ६५ कोटी प्रकाश वर्ष असून हिचे वय १० अब्ज वर्ष असावे, असा वैज्ञानिकांचा अनुमान होता. विश्वातल्या बलाढ्य आकाशगंगाचे घर असणाऱ्या हा सुपरक्लस्टर जेव्हा सर्वांच्या डोळ्यांसमोर आला, तेव्हा कळलं की या विश्वाचा व्याप केवढा मोठा आहे. ती गोष्ट होती ‘सरस्वती सुपरक्लस्टर’ !

हिंदू पुराणातील संगीत आणि विद्येची देवी सरस्वती यांच्या नावानेच या ब्रम्हांडातील सर्वात मोठ्या गोष्टीचे नाव सरस्वती ठेवण्यात आले. भारतातच शोध लागल्यामुळेच भारतीय वैज्ञानिकांनी या नावाचा निर्णय घेतला. हा सुपरक्लस्टर स्लोअन डिजिटल स्काय सर्व्हेच्या Stripe 82 मध्ये आहे. स्लोअन डिजिटल स्काय सर्व्हेच्या माध्यमातून आपण ब्रम्हांडाची डिजिटली त्रिमितीय मॅपिंग करू शकतो. सुपरक्लस्टर म्हणजे विविध आकाशगंगाचा एक महासमूह असतो. उदा. एक आकाशगंगा एका लोकल गॅलेक्टिक ग्रुपचा भाग असते जीच्यामध्ये ५४ आकाशगंगाचा समूह असतो. म्हणजे एका लोकल गॅलेक्टिक ग्रुप नावाच्या घरात ५४ जणांचं एक कुटुंब नांदत असतं. अशा १०० लोकल गॅलेक्टिक ग्रुपमुळे वर्गो सुपरक्लस्टर तयार होतो. या १०० घरांची वर्गो सुपरक्लस्टर ही चाळ तयार होते आणि असे ५०० वर्गो सुपरक्लस्टर बनून एक लानियाकेआ सुपरक्लस्टर बनतो म्हणजे ५०० चाळींचा एक विभाग बनतो, ज्याचा आमदारच खुद्द ब्रम्हांड आहे. आपली आकाशगंगादेखील लानिआकेआ सुपरक्लस्टरचा भाग आहे. समजून घ्यायला किचकट असेल पण ब्रह्मांडाची महानता आणि आपण त्यापुढे किती नगण्य आहोत याची जाणीव तुम्हाला होईल !

सर्वात पहिल्या सुपरक्लस्टरचा शोध ७०च्या दशकात स्टीफन ग्रेगरी, लेर्ड थॉमसन आणि विलियम टीफ्ट यांनी ‘कॉमा सुपरक्लस्टर’ शोधून काढला होता. यानंतर १९८९ साली ‘द शॅप्ले सुपरक्लस्टर’ नावाचा महाकाय सुपरक्लस्टर सगळ्यांच्या नजरेस पडला. २००३ साली ‘द स्लोअन ग्रेट वॉल’ आणि २०१४ साली ‘लानिआकेआ’ सुपरक्लस्टर शोधला गेला होता. मात्र सरस्वती हा आजपर्यंतचा सर्वात दूर असणारा सुपरक्लस्टर आहे. सरस्वतीमध्ये ४० ते ४३ क्लस्टर (आकाशगंगाचे छोटे समूह) आहेत. एका क्लस्टरमध्ये शेकडो आकाशगंगा असतात आणि अशा अनेक क्लस्टरच्या समूहांना ‘सुपरक्लस्टर’ म्हणतात. आता हा प्रवास एका अर्थी पाहायचा झाला तर तो असाही पाहता येईल. तुम्ही स्वतःचं उदाहरण घ्या.

तुम्ही
तुम्ही तुमच्या घरात
तुमचं घर तुमच्या चाळीत
तुमची चाळ तुमच्या विभागात
तुमचा विभाग तुमच्या शहरात
तुमचे शहर तुमच्या राज्यात
तुमचे राज्य तुमच्या देशात
तुमचा देश तुमच्या खंडात
तुमचा खंड तुमच्या पृथ्वीवर
तुमची पृथ्वी तुमच्या सूर्यमालेत
तुमची सूर्यमाला तुमच्या आंतरतारकीय क्षेत्रात
तुमचे आंतरतारकीय क्षेत्र तुमच्या आकाशगंगेत
तुमची आकाशगंगा तुमच्या लोकल गॅलेक्टिक ग्रुपमध्ये
तुमचा लोकल गॅलेक्टिक ग्रुप तुमच्या वर्गो सुपरक्लस्टरमध्ये
तुमचा वर्गो सुपरक्लस्टर तुमच्या लानिआकेआ सुपरक्लस्टरमध्ये
तुमचा लानिआकेआ सुपरक्लस्टर तुमच्या दृश्य ब्रह्मांडामध्ये

आणि तुमचं हे दृश्य ब्रम्हांड तुमच्या मेंदूमध्ये !

हा असा सगळा गौडबंगाल आहे. सरस्वतीचं अस्तित्व वैज्ञानिकांना चाट पाडणारं आहे, कारण १० अब्ज वर्षांपूर्वी इतक्या बलाढ्य दीर्घिका महासमूहाची निर्मिती होणे शक्यच नाही, असे वैज्ञानिक मानतात. आपल्या ब्रम्हांडाचीच निर्मिती जवळपास १३.८ अब्ज वर्षांपूर्वी झाली होती. ब्रह्मांडाच्या संरचनेची व्याख्या करण्यासाठी ‘डार्क मॅटर’ आणि ‘डार्क एनर्जी’ या दोन गोष्टींचा उपयोग केला आहे. डार्क मॅटर फार मोठा असल्यामुळे आणि तो ब्रम्हांडला एकत्रित ठेवण्यास मदत करतो आणि डार्क एनर्जी याच्या जवळपासच उपस्थित असते. या दोन गोष्टींच्या प्रभावामुळे ब्रम्हांडाचं वर्तमान अवस्थेतील संतुलन डगमगत नाही. आपण हे मान्य जरी केलं की डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीच्या संतुलनामुळे बलाढ्य गोष्टींची निर्मिती होऊ शकते, तरी इतक्या महाप्रचंड आकाराचा सुपरक्लस्टर तयार होणं आजही रहस्य आहे. ब्रम्हांडातील असेच अगणित रहस्य आपल्याला त्यांची कोडी सोडवण्यासाठी भाग पाडत असतात, मग तो सूक्ष्मातिसूक्ष्म अणू असो किंवा महा महा बलाढ्य सरस्वती सुपरक्लस्टर !

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Rashmi
Rashmi
2 years ago

खूपच माहितीपूर्ण लेख. घट ते मेंदू विश्लेषण सुंदर!

Rashmi
Rashmi
2 years ago

खूपच माहितीपूर्ण.लेख.घट पासून मेंदू पर्यंत च विश्लेषण सुंदर.