You are currently viewing शिवरायांचे आठवावे रूप

शिवरायांचे आठवावे रूप

तिमिर बंस हर अरुन कर आयौ सजनी भोर?|
‘सिव सरजा’ चूप रहि सखी, सरज सूर सिरमौर ||

– कविराज भूषण

महा-राष्ट्र म्हणजे उंचच-उंच डोंगरांची, ताशीव कड्यांची, प्रचंड अवघड गडकोटांची, खोल दऱ्या-खोऱ्यांची, घनदाट जंगलांची मांदियाळी. महाराष्ट्र शारदेच्या पोटी जन्मलेला रणमार्तंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्याप्रमाणे टाळ आणि मृदुंगाचा झिणत्कार ऐकल्यावर मराठी मन गहिवरतं, अगदी त्याचप्रमाणे “छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय” हे शब्द कानी पडले की महाराष्ट्राचं रांगडी तन शहारतं. थोरल्या स्वामींना विसरायचं म्हंटल तरी विसरू शकत नाही, मराठी मनात इतक्या अढळपदावर राजा विराजमान आहे. थोडक्यात शिवराय म्हणजे महाराष्ट्राचे “राष्ट्रदेव” .

शिवजन्मापूर्वी मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही या परकीय पातशहांच्या जुलमी कारभाराने रयत अक्षरशः भरडून निघत होती, यातच भर म्हणुन इथली आमची वतनदार मंडळी याच सुलतानांची चाकरी करण्यात धन्यता मानत होती. कुण्या परकीय सुलतानी दरबाराची प्रतिष्ठा राखण्यापायी इथल्या लेकरांची अगणित मुंडकी कटत होती. राहळातील तरुणांच्या मनामनात शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, त्यांच्या मनगटातील सामर्थ्य एका दिव्य धेय्यासाठी समर्पित करण्यास प्रवृत्त केलं. कविराज भूषण म्हणतो “और गढोई नदी, नद सिव गढपाल दऱ्याव | दौरी दौरी चहू और ते, मिलत आणि यह भाव ||”. या छंदात भूषण शिवरायांना समुद्राची तर मावळ्यांना छोटछोट्या नद्यांची उपमा देऊन म्हणतो, ज्याप्रमाणे छोटछोट्या नद्या एकत्र येतात व समुद्राला मिळतात, अगदी त्याचप्रमाणे हे मावळे धावत धावत शिवाजी राजाला येऊन मिळतात.

१७२६ साली Francois Valentin याने “Oud en Nieuwe Oostindie (Old and New East Indies)” नावाचे 5 खंडांचे पुस्तक लिहले, त्यात Valentine ने शिवरायांचे छापलेले छायाचित्र.
चित्राच्या खाली “DeH Heer Seva Gi” लिहले आहेत याचा अर्थ “राजा शिवाजी” असा होतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीया शालिवाहन शके १५५१ अर्थात फिरंगी तारीख १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. “द फॉरेन बायोग्राफिज ऑफ शिवाजी” या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ज्येष्ठ बंगाली इतिहास संशोधक सुरेंद्रनाथ सेन म्हणतात “शिवराय जिवंत असतानाच त्यांची कीर्ती युरोपिय देशांपर्यंत पोहोचली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, साहसी कृत्ये आणि कुशल युद्धनीती या सर्वांमुळे त्यांना इंग्लिश, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इटालियन दस्तऐवजांमध्ये स्थान प्राप्त झाले”. शिवरायांच्या सर्वदूर पसरलेल्या किर्तीला कविराज भूषणाच्या अलौकिक काव्यप्रतिभेने आणखीच धार चढते, भूषण आपल्या एक छंदात म्हणतो, शिवाजी राजाची कीर्ती जगभरात इतकी पसरली आहे, की त्याच्या तेजापुढे चांदणी आणि क्षीरसागराने स्वतःवर गर्व करायचे काहीच कारण नाही.
गरब करत कित चाँदणी हरि के छीर समान | फैलाई तो सम जगति कीरती सिवा खुमान ||“. दक्षिण दिग्विजय मोहिमेवेळी शिवरायांनी दक्षिणेत व्यंकोजी राजांची भेट घेतली. शहाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र या नात्याने शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांकडे वडिलोपार्जित संपत्ति मधे वाटा मागीतला. पण ही मागणी ऐकून व्यंकोजी राजांनी छावणीतून तिथून पळ काढला. महाराजांना जेव्हा हे समजलं तेव्हा, महाराज रागावले या प्रसंगाच सुंदर वर्णन सभासद बखरीत आलं आहे. महाराज म्हणतात “आम्हांस बिरदें काय करावयाची ? आमची बिरदे अष्ट दिशेस लागलीं आहेत. समुद्रवलयांकित भूमंडळी किर्त आपली जाली आहे. तेथें बिरदें काय करावयाचीं ?”

राजाच्या निर्वाणानंतर शंभुराजांना लिहलेल्या पत्रात समर्थ म्हणतात शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप |. समर्थ आपल्याला शिवरायांचे रूप, त्यांचा प्रताप आठवायला सांगतात तेव्हा, या छत्रपती शिवाजीने असं नेमकं काय केलंय की महाराष्ट्राला त्याचं अमरण स्मरण व्हावं असा प्रश्न मनाला सहज पडतो. शिवाजी महाराज कसे दिसायचे? , त्यांचा स्वभाव कसा होता ? याबद्दल कवींद्र परमानंद, जयराम पिंडे, कविराज भूषण या कवींनी जी कवणे रचली किंवा परकालदास, थेव्हनोट, फ्रँझुवा व्हॅलेंटाईन, कॉस्मे दि गार्दा, हेंरी गॅरी, थॉमस निकोलस या समकालीन प्रवाशांनी वर्णने लिहून ठेवली. त्याचा ऐतिहासिक आढावा या लेखाद्वारे आपल्या समक्ष मांडत आहोत !

● शिवभारतातील शिवरायांच्या बाल-लीला

असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तारुण्यात साहस, चातुर्य यांच्या जोरावर स्वतःची यशकीर्ती सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या शिवरायांच्या बाललीला शिवभारत या खंड-काव्यात वाचायला मिळतात. शिवभारत हे संस्कृत काव्य शिवरायांच्याच आज्ञेवरून लिहिले, असे ग्रंथाचे रचनाकर्ते कवींद्र परमानंद यांनी आपल्या काव्यात लिहले आहे. शिवभारतात एकूण ३१ अध्याय पूर्ण, तर ३२व्या अध्यायात ९ श्लोक आहेत. बाल शिवाजीच्या शिवनेरीवरील बाललीलांचे वर्णन करताना परमानंद म्हणतात, “तो बालक मोराची पिसे उपटण्यासाठी मोरांच्या कळपामागे धावत असे. कधी मोर, पोपट, कोकीळ यांसारख्या पक्ष्यांच्या आवाजाची तो हुबेहुब नक्कल करी, तर कधी एकदम वाघासारखी डरकाळी फोडून आसपासच्या दास्यांना घाबरवत असे. आसपासचे लहान लहान सवंगडी जमवून, मातीचे किल्ले बनवी, तर कधी याच मातीचा एखाद बकाना तोंडात भरत असे”. शिवरायांच्या या लीला वाचल्यावर त्यांचं व्यक्तिमत्व लहानपणापासूनच विलक्षण होतं याची प्रचिती येते.

१७८२ साली रॉबर्ट ऑर्म याने लिहलेल्या ग्रंथातील महाराजांचे छायाचित्र.

● परकालदासाने केलेले वर्णन :-

मिर्झा राजा जयसिंगाच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज वाढदिवसानिमित्त औरंगजेबाची भेट घेण्यासाठी आग्र्याला रवाना झाले. शिवाजी महाराजांची पालखी आग्ऱ्यात प्रवेश करत असताना कुंवर रामसिंगाचा अधिकारी परकलदास याने पाहिली. २९ मे १६६६ रोजी कल्याणदास या दिवाणाला लिहिलेल्या पत्रात शिवरायांचे वर्णन करताना परकलदास लिहतो,

“अर सेवोजी डील तो हकीर छोटो सो ही देखता दिस जी । अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपुछो राजवी दीसो जी । हिम्मती मरदानगी ने देखता ही असौ दिसो जु बहुत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो । सेवाजी के डाढी छै ।”


अर्थात :- “प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांना महाराज काहीसे कमी उंचीचे व सडपातळ वाटतात. मात्र त्यांचा चेहरा गोरापान असून चौकशी न करताही ते राजे आहेत हे चटकन ओळखू येते. पाहिल्याबरोबरच हा माणूस हिंमतवान व मर्दाना असल्याचे लक्षात येते. महाराजांना दाढी आहे.”
.

● रेव्हरंड एस्कलिएट याने स्मिथ कडून ऐकीव माहितीच्या आधारे केलेले वर्णन :-

इ.स १६६४ साली शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, या लुटीच्या वेळी अँथोनी स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने महाराजांना पाहिले होते, पुढे स्मिथ ने महाराजांचे वर्णन रेव्हरंड एस्कलिएट या अधिकाऱ्याला सांगितले, त्याने टिपून ठेवलेले महाराजांचे पुढीलप्रमाणे, “His personality is described by them, who have seen him, to be man of stature lower some what than I am erect & of excellent proportion. Actual in exercise & whenever he speaks seems to smile a quick and piercing eye & Witter than any of his people.”
याचा अर्थ “शिवराय दक्षिणेतील इतर मावळ्यांपेक्षा गौरवर्णी आहेत, त्यांचा बांधा मध्यम असला, तरीही शरीर मात्र एकदम प्रमाणबद्ध आहे. ज्यावेळी ते बोलतात, त्यावेळी स्मितहास्य करून भेदक नजरेने पाहतात.

मीर मोहम्मद याने काढलेले शिवरायांचे चित्र. इतिहास अभ्यासकांच्या मते चित्र १६८६ मध्ये काढले असावे, आता हे चित्र पॅरिस म्युझिम येथे आहे.

● कॉस्मे द गॉर्डा याने केलेले शिवरायांचे वर्णन :-

शिवरायांचे सर्वात पहिले पाश्चात्य चरित्र लिहण्याचा मान कॉस्मे द गॉर्डा याला जातो, त्याच्याविषयी वैयक्तिक काहीच माहिती उपलब्ध नाही. इ.स १६९५ साली कॉस्मे दि गार्दाने “Life of Celebrated Shivaji” हे शिवरायांचं चरित्र तत्कालीन ऐकीव माहितीच्या आधारे लिहून पूर्ण केलं. मूळ पोर्तुगीज भाषेत असलेलं हे चरित्र १७३० मध्ये प्रकाशित झालं. आपल्या पुस्तकात शिवरायांच्या व्यक्तित्वाबद्दल गोर्डा लिहतो.
“He was not only quick in action but lively in carriage also, for with a clear and fair face nature had given him the greatest perfectionists, specially the dark big eyes was so lively that they seemed to dart rays of fire. To these added a quick, clear & acute intelligence.”
भाषांतर :- शिवराय कारवाईत तत्पर होतेच पण सोबतच धाडसी पण होते. निसर्गाने त्यांना उत्तम गौरवर्णी चेहरा दिला होता. विशेषतः त्यांच्या काळ्याभोर डोळ्यांतून आग ओकत असल्याचा भास होत आहे. यासोबतच स्पष्ट आणि तीव्र बुद्धीमत्ता ही त्यांच्या अंगात सामावल्या होत्या.

कॉस्मे द गॉर्डा शिवरायांचे केलेले मोहक आणि तितकेच धारदार वर्णन, कविराज भूषणाच्याही एक छंदात पाहायला मिळतं. भूषण म्हणतो, अरे सर्वांच्या सर्वच इच्छा हा पूर्ण करतो म्हणून कोणी त्याला कल्पवृक्ष म्हणत आहे. तर देहाने अतिशय सुंदर असल्याने कुणाला हा ईश्वरीय अवतार असल्याचे भासत आहे. भूषण म्हणतो याचे राज्य चंद्रकले वाढतच चालले आहे त्यामुळे कोणी याला पृथ्वीतलावरचा चंद्रच म्हणत आहे. एकजण म्हणतो हा रणांगणातील नरसिंहा सारखा शूर आहे, तर एकजण म्हणतो नरसिंहच शिवाजी महाराज आहेत.
“ एक कहैं कल्पद्रुम हैं इमि पुरत है सबकी चितचाहैं |
एक कहैं अवतार मनोज को यौं तनमैं अति सुंदरता हैं |
भूषण एक कहैं महि इंन्दु यौं राज बिराजत बाढ्यौ महा हैं |
एक कहैं नरसिंह हैं संगर एक कहैं नरसिंह सिवा हैं ||”

ब्रिटिश म्युझियम लंडन येथे शिवाजी महाराजांचे असलेले चित्र


● जीन डी थेव्हनॉट.

जीन डी थेव्हनॉट हा फ्रेंच प्रवासी १६६५ साली भारतात आला, सुरतेत मिळालेल्या ऐकीव माहितीच्या आधारे थेव्हनॉटने शिवरायांचे संक्षिप्त चरित्र लिहण्याचा प्रयास केला. शिवरायांचे थेव्हनोट याने केलेले वर्णन “History of Shivaji” नावाने प्रसिद्ध आहे. आपल्या चरित्रात थेव्हनोट महाराजांबद्दल लिहतो_

“This raja is short & towny, with quick eyes that shew a great deal of wit. He eats once a day commonly & is in good health; & when he plundered surat in the year 1634, he was 35 years of age.”
भाषांतर :- हा(शिवाजी) राजा उंचीने कमी तर गौरवर्णी आहे, त्याचे डोळे तेजस्वी असून त्यांमध्ये बुद्धिमत्ता झळकते. ते दिवसातून एकदाच जेवण करतात व त्यांचे स्वास्थ्य उत्तम आहे. सन १६६४ मध्ये सुरतेवर आक्रमण केले तेव्हा त्यांचे वय पस्तीस वर्ष होते.

छायाचित्रे :- इंटरनेट

संदर्भ सूची :-

  1. शककर्ते शिवराय – विजयराव देशमुख
  2. राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे
  3. Foreign Biographies of Chhatrapati Shivaji – Surendra Nath Sen
  4. परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज (अनुवाद) – रोहित पवार
  5. Shivaji’s Visit to Aurangzib at Agra – Jadunath Sarkar
  6. सभासद बखर
  7. कवीन्द्र परमानन्द कृत श्री शिवभारतसदाशिव महादेव दिवेकर
  8. शिवभूषण – निनाद बेडेकर
  9. समरधुरंधर (अनुवाद) – विद्याचरण पुरंदरे
  10. अपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज

लेखनसीमा !

लेख आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

0
Please leave a feedback on thisx

ALSO READ___


TAGS_____

#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters


शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Santoah B. Hande
Santoah B. Hande
3 years ago

चांगल्या माहितीचा ठेवा उपलब्ध केलात.

Minal Ganesh Kulkarni
Minal Ganesh Kulkarni
3 years ago

उत्तम माहिती